बेदरकारपणाने घेतला दोघांचा बळी
अन्य दोघे युवक-युवतीही गंभीर जखमी : बेदरकारपणे ‘वन वे’ त शिरल्याने भीषण अपघात, बोरी-बेतोडा बगलमार्गावर कण्णेव्हाळ येथील घटना
फोंडा : बोरी-बेतोडा बगलमार्गावर कण्णेव्हाळ जंक्शनजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात डॉक्टरीच्या शेवटच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी व अन्य एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल गुऊवारी दुपारच्या सुमारास घडला. आदित्य देसाई (21, राहणारा सनग्रेस गार्डनजवळ बेतोडा) व ईशा गवस (24, मोर्ले सत्तरी) अशी मृतांची नावे आहेत. ईशाच्या पाठीमागे बसलेली आदिती मांद्रेकर (24, पर्ये-सत्तरी) व आदित्यच्या पाठिमागे बसलेला योगेश पाटील (22, म्हाळशी कुर्टी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
या धडकेत आदित्य व त्याचा मित्र योगेश पाटील तसेच ईशा व तिची मैत्रिण आदिती रस्त्यावर कोसळली. अत्यवस्थ अवस्थेत विव्हळत असताना येथील गॅरेज व रेती व्यवसायिकांच्या मजुरांनी त्यांना मदत केली. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात पोचण्यापूर्वीच दोघाजणाची प्राणज्योत मावळली. दोघा जखमींना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा गावस यांनी पंचनामा केला.
शिरोड्याहून पर्ये सत्तरी येथे घरी परतीच्या वाटेवर असताना व्रुर काळाने या दोघा होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांवर झडप घातली. ईव्ही दुचाकीने आपल्या वाटेने जात असताना वन वे मार्गवरून विरूद्ध दिशेने बेदरकारपणे आलेल्या आदित्य या व्हेस्पा दुचाकीची धडक त्यांचा काळ बनून आली. शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथीच्या ईशा व तिच्या मागे बसलेली पर्येतील युवती या विद्यार्थिनी हॉमिओपॅथीच्या चौथ्या वर्षातील आहेत. चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर डॉक्टर बनण्याचे स्वप्न त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिले होते. पाठिमागे बसलेल्या आदितीने हेल्मेट परिधान केल्याचे प्रथमदर्शनी बघितलेल्या काहींनी सांगितले. त्यामुळेच ती बचावल्याचे म्हटले जाते. सध्या ती बांबोळी येथील गोमेकॉत उपचार घेत आहे.
माजी नगराध्यक्षांकडून जखमींची विचारपूस
या घटनेची माहिती मिळताच फोंड्याचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर जखमींना हलविण्यात आलेल्या आयडी इस्पितळात धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मृत आदित्य देसाई यांचे कुटुंबीय बेतोडा येथील सनग्रेस गार्डनजवळ हल्लीच राहायला आले होते. आदित्यच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.
स्वप्नपूर्ती होण्याअगोदरच ईशाचा बळी
दुचाकी ‘वन वे’ मार्गाने चुकीच्या दिशेने बेदरकारपणे हाकल्यामुळे ईशा गवस या निष्पाप युवतीचा बळी गेला आहे. बेदरकारपणे व्हेस्पा चालविणारा आदित्य देसाई स्वत:ही बळी ठरला. आदित्यच्या पाठिमागे बसलेल्या पाटील याला आपला मित्र चुकीच्या मार्गाने वाहन नेत असल्याचे माहीत होते. तरीही त्याने त्याला काहीच प्रतिकार केला नाही? असे दोघे युवक कुठल्या धुंदीत होते? मात्र त्या दोघांही निष्पाप युवतींचा काय दोष? असा प्रश्न घटनास्थळावरील लोकांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी या विद्यार्थिनींचा सेन्ड ऑफ म्हणजेच निरोप समारंभ झाला होता. येत्या ऑगस्टमध्ये शेवटची परीक्षा होणार होती. त्यानंतर एक वर्षाच्या इंटर्नशिपनंतर पूर्णवेळ डॉक्टर होण्यापूर्वीच ईशाचा बळी गेला.