जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष पसरविणाऱ्यांपासून सावध रहा
20 मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे आवाहन : कित्तूर उत्सवाचा समारोप
प्रतिनिधी/ बेळगाव
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांत एकमेकांबद्दल द्वेष पसरून देशावर ताबा मिळविला. ब्रिटिशांना आमच्याच काही नागरिकांनी पाठिंबा दिला. राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांच्या विरोधात फितुरी केली. आजही भारतात जाती-धर्माच्या नावाखाली भारतीयांत द्वेष पसरविण्याचे कारस्थान सुरू असून यापासून जागरुक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. कित्तूर येथे शनिवार दि. 25 रोजी झालेल्या कित्तूर उत्सव समारोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते.
कित्तूरची राणी चन्नम्मा हिने ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन 23 ऑक्टोबर 1824 रोजी विजय संपादन केला. या विजयाची आठवण म्हणून प्रतिवर्षी कित्तूर उत्सव साजरा करण्यात येत असतो. राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, अमटूर बाळाप्पा हे स्वाभीमानाचे संकेत आहेत. चन्नम्माच्या ब्रिटिशांविरुद्ध लढ्याबाबत राज्यातील जनतेला माहिती करून देण्यासाठी 2017 मध्ये आमच्याच सरकारने कित्तूर चन्नम्मा जयंती उत्सवाला सुरुवात केली, हे सांगताना मला अभिमान वाटतो. चन्नम्माचे शौर्य, धैर्य जनतेला समजावून देण्यासाठी जयंती साजरी करण्यात येत असते. यात कोणताही राजकीय उद्देश नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. चन्नम्माची समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकारतर्फे केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. बेळगाव विमानतळाला वीरराणी चन्नम्मा नामकरण करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. बाबासाहेब पाटील आमदार बनल्यानंतर कित्तूर उत्सव शिस्तबद्ध व वैशिष्ट्यापूर्णरीत्या साजरा करण्यासाठी नेतृत्त्व करीत असून याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, राणी चन्नम्माचा इतिहास देशातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रतिवर्षी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येते. कित्तूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कित्तुरातील ऐतिहासिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी प्राधिकरणाला जादा अनुदान मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली. वीरशैव लिंगायत विकास निगमचे अध्यक्ष विजयानंद काशप्पन्नवर, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज आदींचीही यावेळी भाषणे झाली. त्यानंतर कित्तूर राजगुरु संस्थानचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामी यांचे आशीर्वादपर भाषण झाले. निच्चनकी मठाचे पंचाक्षरी महास्वामी, कादरवळ्ळी मठाचे डॉ. पालाक्ष, शिवयोगीश्वर यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद सलीम अहमद, राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम., जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यासह मान्यवर उपस्थित होते.