फ्रान्समध्ये कार घुसवून दहशतवादी हल्ला
वृत्तसंस्था / पॅरीस
फ्रान्समध्ये एका दहशतवाद्याने भर रस्त्यात सायकरस्वारांमध्ये कार घुसवून दहशतवादी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 सायकलस्वार जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी चारजण गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी डल्लास डी ओलेरॉन या भागात घडली. पादचाऱ्यांवर आणि सायकलस्वारांमध्ये कार घुसविताना या दहशतवाद्यांने अल्ला हू अकबर अशा घोषणा दिल्या, अशी माहितीही फ्रान्सच्या पोलिसांनी दिली आहे. तसेच दहशतवाद्याने हा हल्ला जाणूनबुजून केला असून तो अपघात नाही, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. त्याला पकडतानाही त्याने अल्ला हू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या. ही घोषणा इस्लामी दहशतवाद्यांकडून दहशतवादी हल्ले करताना दिली जाते, अशीही माहिती देण्यात आली. हल्लेखोराचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याने हे कृत्य एकट्याने केले की त्यामागे आणखी दहशतवादी आहेत, याची पडताळणी केली जात आहे. कोणत्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला, याचीही तपासणी केली जात आहे, अशी माहिती या शहराच्या प्रशासनाने दिली आहे.