For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारमानस फेरीधक्क्यावरून कार पाण्यात

02:52 PM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
सारमानस फेरीधक्क्यावरून कार पाण्यात
Advertisement

खलाशी शुभम फडतेच्या शौर्यामुळे कारचालक बचावला : फेरीबोटमधून रिव्हर्समध्ये कार बाहेर काढतानाची घटना 

Advertisement

डिचोली : सारमानस पिळगाव येथील सरमानस फेरीधक्क्यावर धारबांदोडा या फेरीबोटमधून रिव्हर्स गियरमध्ये गाडी बाहेर काढत असताना गाडी अचानक बंद पडल्याने चालकाचा गाडीवरील ताबा गेला. तसेच ब्रेकही लागू शकले नाही. परिणामी सदर कार थेट सारमानस फेरीधक्क्याच्या बाजूलाच पाण्यामध्ये गेली. कारमध्ये असलेल्या पिळगाव येथील युवकाला धारबांदोडा फेरीबोटवरील खलाशी शुभम फडते यांनी धाडस दाखवून पाण्यात झेप घेऊन गाडीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी सदैव घातकी ठरत असलेल्या सारमानस फेरी धक्क्याबद्दलही लोकांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

ही घटना काल सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार, सांत इस्तेव येथून वाहने व प्रवाशांना घेऊन आलेली धारबांदोडा ही फेरीबोट सारमानस पिळगाव येथील फेरीधक्क्यावर लागली. फेरीधक्क्यावर लागताच आतील जीए 03 एच 4183 ही फोर्ड फिगो कार चालवित असलेला मूळ म्हापसा परंतु सध्या पिळगाव येथे राहणाऱ्या टिपू या युवकाने रिव्हर्स गिअरमध्ये गाडी बाहेर काढली. गाडी फेरीबोटीतून बाहेर फेरीधक्क्यावर पोहोचताच अचानक बंद पडली व कारचे ब्रेकही लागू शकले नाही. परिणामी कार थेट फेरीधक्क्याच्या बाजूलाच पाण्यामध्ये गेली.

Advertisement

शुभम फडते यांनी वाचविले प्राण

ही घटना घडताच सर्वत्र एकच खळबळ माजली. या गोंधळातच कार आत जाताना पाहिलेल्या खलाशी शुभम फडते यांनी थेट पाण्यात उडी घेतली. कारला जलसमाधी मिळते तोपर्यंत शुभम फडते यांनी कारमध्ये अडकलेल्या युवकाला बाहेर काढण्यात यश मिळवले. यावेळी त्यांनी फेरीबोटमधील फ्लोटर ट्यूब त्याला दिला. सदर युवकाचा पाय कारमध्ये अडकला होता, तो सोडवून शुभम यांनी त्याला कारबाहेर काढून सुखरूप जमिनीवर आणले. शुभम याच्या या शौर्याचे येथे जमलेल्या लोकांनी तसेच सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दल तसेच पोलिसस्थानकालाही देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान, पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी यांच्या मार्गदर्शनाखाली सारमानस येथे दाखल झाले. पाण्याखाली असलेली कार पाण्याबाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. स्थानिकांनी लहान बोट आणून कारच्या वरच्या भागात पाण्यामध्ये ठेवून कारवर लक्ष ठेवले. त्यानंतर कारला दोरखंडाने बांधून एक दोरखंड अग्निशामक दलाच्या वाहनाला बांधण्यात आला. दुसरा दोरखंड जमलेल्या लोकांनी ओढून कार कशीबशी पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. या संपूर्ण बचाव कार्यात स्थानिक लोकांनी बरेच सहकार्य केले.

धोका कमी करण्याचे प्रयत्न  

सामानस येथील फेरीधक्का हा धोकादायकच असून या अत्यंत उतरणीच्या अशा धोकादायक फेरीधक्क्यावर अनेक अपघात यापूर्वीही घडले आहेत. त्यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. या फेरीबोट धक्क्याची डागडुजी व्हावी तसेच या धक्क्यामुळे वाहनांना धोका कमी व्हावा त्यासाठी आमचेही प्रयत्न सुरू आहेत, असे स्थानिक पंचसदस्य सुनील वायंगणकर यांनी सांगितले. सारमानस पिळगाव येथील सदर फेरीधक्का हा अत्यंत धोकादायक आहे.

वरून थेट फेरीधक्क्यापर्यंत असलेली उतरण ही आणखी धोकादायक असून या धोकादायक उतरणीवर अनेकवेळा पार्क करून ठेवलेल्या तसेच नियंत्रण सुटल्याने अनेक गाड्या पाण्यात गेलेल्या आहेत. हल्लीच्याच काळात या फेरीधक्क्यावर दोन-तीन अशा गाड्या पाण्यामध्ये जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या फेरीधक्क्याची सुधारणा करून लोकांचे प्राण वाचावे, यासाठी सरकारने उपाययोजना हाती घेणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिकांबरोबर योग्य ती चर्चा व सल्लामसलत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.