कॅनोलमध्ये कार कोसळली; दोन मित्र ठार, एक जखमी
कुर्डुवाडी :
कुर्डुवाडी - टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर (ता. माढा) येथील कॅनोलमध्ये कार कोसळून दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मयतांची नावे शंकर उत्तम बंडगर (४४) आणि अनिल हनुमंत जगताप (५५) असून ते दोघेही रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील रहिवासी आहेत. तर सुरेश राजाराम जाधव (४९) हे जखमी झाले असून त्यांनीच याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शंकर बंडगर यांचा मुलगा वधूपरिचयासाठी धाराशीव येथे जाण्याचे ठरले होते. यासाठी ते, अनिल जगताप आणि सुरेश जाधव हे तिघे एकत्र नॅक्सॉन (MH 42 BE 8954) या कारने धाराशीवला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री ९ वाजता चिंचगाव येथील हॉटेलमध्ये जेवण करून वडापुरीकडे निघाले. मात्र पिंपळनेर गावाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार लोखंडी गार्डला धडकून थेट कॅनोलमध्ये कोसळली व उलटली.
फिर्यादी सुरेश जाधव यांनी प्रसंगावधान राखत कारच्या दरवाजातून बाहेर पडून मदतीसाठी आरडाओरड केली. हॉटेलमधील कामगार आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. मात्र दोन्ही दरवाजे लॉक झाल्याने शंकर बंडगर व अनिल जगताप यांना वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
- अखेरच्या क्षणीही साथ सोडली नाही...
शंकर बंडगर आणि अनिल जगताप हे दोघेही गावात जिवलग मित्र म्हणून ओळखले जात. गावकरी सांगतात, की "हे दोघे कायम एकत्रच असायचे, आणि दुर्दैवाने मृत्यूच्याही क्षणी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही."