Miraj Accident : भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, एकजण जागीच ठार
सांगली-मिरज रस्त्यावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत खोळंबली होती
मिरज : शहरातील सांगली-मिरजरस्त्यावरील कृपामयी उड्डाणपुलावर भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. आदित्य कृष्णा बनसोडे (वय 21, रा. समतानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास अपघात झाला.
याबाबत गांधी चौकी पोलिसांनी संशयीत चारचाकी चालकाला ताब्यात घेतले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्यामुळे सांगली-मिरज रस्त्यावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत खोळंबली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री 11 वाजता आदित्य बनसोडे हा समतानगर येथून अॅक्सेस मोपेड दुचाकी (एमएच-10-एव्ही-9535) वऊन सांगलीकडे जात होते. यावेळी मिरजेकडून सांगलीकडे जाणारी आय-20 कार (एमएच-10-सीएच-5238) उड्डाणपुलावरुन वेगात आली.
समतानगर येथून सांगलीकडे वळण घेत असतानाच चारचाकीची आदित्य बनसोडेच्या दुचाकीला धडक बसली. यात गंभीर जखमी होऊन आदित्य जागीच ठार झाला. तर दुचाकीचा चक्काचूर झाला. सदर अपघातानंतर सांगली-मिरज रस्त्यावर वाहतूक खोळंबली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी घटनास्थळी जावून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूली करुन वाहतूक सुरळीत केली. मयत आदित्यवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संशयित कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.