Car Accident : अणुस्कुरा घाटात कार दरीत कोसळून अपघात, तरुणाचा दुर्दैवी अंत
अणुस्कुरा घाटातील घटना, कारच्या इंजिनचे तुकडे घाट रस्त्यावर
राजापूर : राजापूर-कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात कार चारशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये लांजा येथील कौस्तुभ विजय कुरुप (30) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचे अक्षरश: तुकडे होऊन इंजिन घाटातील रस्त्यावर येऊन पडले.
या अपघातात कौस्तुभचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला. दरम्यान, मृत कौस्तुभ हा बेपत्ता असल्याची फिर्याद सोमवारी लांजा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यामुळे कौस्तुभच्या अपघाती मृत्यूचे गूढ वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ हा सोमवार 2 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
दरम्यान, मंगळवार 3 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले. त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन व गाडीचे इतर सुटे भाग पुन्हा दिसले.
त्यामुळे त्याने तत्काळ अणुस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन अणुस्कुरा घाटात तपास सुरू केला. यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे दीडशे फूट खाली कौस्तुभचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळून आला तर गाडीचे इतर सुटे भाग सुमारे 400 फूट खोलवर विखुरलेले दिसले.
लांजातील ग्रामस्थांची धाव
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही अपघाताचे वृत्त समजताच धावून आले.
कौस्तुभचा मृतदेह वरती काढण्याचे काम सुरु होते. मात्र सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. कौस्तुभ लांजा तालुक्यातील असल्याने लांजातून अनेक ग्रामस्थांनी अणुस्कुरा घाटाकडे धाव घेतली होती.
दाट धुक्यामुळे अपघाताचा अंदाज
दरम्यान, कोल्हापूरहून परत येत असताना अणुस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.