पकडलेल्या मोकाट जनावरांची रवानगी गो-शाळेत
बेळगाव : महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून शहरातील मोकाट जनावरे पकडून त्यांची श्रीनगर येथील गो-शाळेत रवानगी केली जात आहे. बुधवारी फुलबाग गल्ली स्टेशनरोड येथे 2, यंदेखूट येथे 2 आणि वनिता विद्यालयानजीक 2 अशी एकूण 6 जनावरे पकडण्यात आली. सातत्याने जनावरांची धडपकड सुरू असल्याने जनावरे मालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शहरात जनावरांना सोडण्यात येऊ नये, अशी सूचना केली जात असली तरी अद्यापही बहुतांशजण जनावरे सोडून देत आहेत. त्यामुळे याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. अलीकडेच महापालिकेने जनावरे पकडण्याचा ठेका एका नवीन ठेकेदाराला दिला आहे.
त्यामुळे विविध ठिकाणी दररोज जनावरे पकडली जात आहेत. जनावर सोडवून घ्यायची असल्यास संबंधित जनावर मालकांकडून प्रति जनावरासाठी दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे. यापैकी एक हजार रुपये ठेकेदाराला तर एक हजार रुपये गो-शाळा चालकाला दिले जात आहे. बुधवारी सकाळी फुलबाग गल्ली स्टेशन रोड, यंदे खूट, वनिता विद्यालय रोड अशी एकूण सहा जनावरे पकडून यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत करण्यात आली. पशुसंगोपन विभागाचे प्रमुख वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.