इंग्लंड संघाला अहंकारी म्हणणे कर्णधार स्टोक्सला नामंजूर
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
गेल्या आठवड्यात पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या अॅशेस कसोटीत पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपला संघ अहंकारी असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याची तयारी इंग्लंडकडून शनिवारी चालू होती. स्टोक्सचा संघ गुऊवारपासून ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविऊद्ध खेळणार आहे.
मालिकेच्या सलामीच्या सामन्यात दोन दिवसांतच आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडवर व्यापक टीका होत आहे. ‘आम्हाला बकवास म्हणा, तुम्हाला जे हवे ते बोला. आम्हाला हव्या असलेल्या पद्धतीने हा कसोटी सामना झाला नाही. पण त्या सामन्याच्या काही टप्प्यांमध्ये आम्ही उत्तम होतो’, असे स्टोक्स म्हणाला.
‘मला वाटते की, संघाला अहंकारी म्हणणे थोडे जास्त होते. पण ते ठीक आहे. आम्ही कठीण परिस्थितीला सहजपणे सामोरे जाऊ. बकवाससारखे शब्द ठीक आहेत, पण अहंकारी ? मला ते योग्य वाटत नाही’, असे स्टोक्स म्हणाला. 1950 नंतर पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिका जिंकलेली नाही आणि ब्रिस्बेनमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळविण्यात येणार आहे. पर्थमधील निकालानंतरही स्टोक्सने संघ त्यांच्या आक्रमक तत्त्वांना चिकटून राहील, असे सांगितले आहे.
‘त्या कसोटी सामन्यात आम्ही काही आश्चर्यकारक गोष्टी केल्या. त्या सामन्यात असे काही क्षण होते जेव्हा आम्हाला असलेल्या अनुकूलतेचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्हाला ते माहित आहे आणि आम्हाला ते समजते’, असे तो म्हणाला. स्टोक्स आणि त्याचे सहकारी बुधवारी ब्रिस्बेनमध्ये पोहोचले.