कॅन्टोन्मेंटच्या टर्फ मैदानाला अखेर मिळाला मुहूर्त
बिटा कंपनीला परवानगी : चार वर्षांनंतर मैदान होणार खुले
बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या टर्फ मैदानाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. चार वर्षांपासून काही तांत्रिक कारणांनी मैदानाच्या वापराला मंजुरी देण्यात आली नव्हती. परंतु शाळेच्या कालावधीत कॅन्टोन्मेंट शाळांमधील विद्यार्थ्यांना तर त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना हे मैदान वापरता येणार आहे. पुणे येथील बिटा स्पोर्ट्स क्लबतर्फे 2021 मध्ये कॅन्टोन्मेंट शाळेच्या मैदानावर फुटबॉल मैदान बांधण्यात आले. चांगल्या दर्जाच्या सुविधा या मैदानावर देण्यात आल्या. त्यावेळी बिटा कंपनीसोबत 20 वर्षांचा करार करण्यात आला होता.
परंतु पुणे येथील कार्यालयाने हा करार काही कारणांनी थांबविला होता. त्यामुळे मागील चार वर्षांपासून टर्फ मैदान बांधूनदेखील वापराविना पडून होते. त्यामुळे हे मैदान वापरात यावे यासाठी बिटा कंपनीचा पाठपुरावा सुरू होता. मंगळवारी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत मैदानाच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. बिटा कंपनीने तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून टर्फ मैदान उभारले आहे. त्यामुळे याचा वापर विद्यार्थ्यांनाही व्हावा यादृष्टीने वापराची मंजुरी कॅन्टोन्मेंट बोर्डने दिली. बिटा कंपनीला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये भाडे कॅन्टोन्मेंट बोर्डकडे जमा करावे लागणार आहे.
तर करार रद्द होणार...
कॅन्टोन्मेंट शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी टर्फ मैदानाला मंजुरी देण्यात आली. शाळेच्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना टर्फ मैदानावर प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तर उर्वरित वेळेत कंपनी खासगी प्रशिक्षण घेऊ शकते. परंतु शाळेच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाल्यास हा करार रद्द केला जाईल, असा इशारा सीईओ राजीवकुमार यांनी बिटा कंपनीला दिला आहे.