फ्लेक्स उभारणीतून कॅन्टोन्मेंटचा महसूलवाढीचा प्रयत्न
रेल्वेस्टेशन, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प येथे उभारले जाणार जाहिरात फलक : खुल्या जागांवर फ्लेक्स उभारणार
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने महसूल वाढीसाठी आता अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. कॅन्टोन्मेंटच्या खुल्या तसेच गर्दीच्या परिसरात फ्लेक्स उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेस्टेशन, धर्मवीर संभाजी चौक तसेच कॅम्प भागामध्ये फ्लेक्स उभारणी केली जात आहे. यातून कॅन्टोन्मेंट बोर्डला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंटने फ्लेक्सच्या निविदा काढल्या होत्या. जाहिरात फलक लावण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून या निविदा काढण्यात आल्या होत्या. याला काही व्यावसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गर्दीच्या ठिकाणी फ्लेक्स उभारणी करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत मोठे फ्लेक्स लावले जाणार आहेत.
यासाठी लोखंडी खांब उभे करण्याचे काम मागील चार दिवसांपासून सुरू होते. याबरोबरच धर्मवीर संभाजी चौक येथील उभा मारुती चौक परिसरात खुल्या जागेमध्ये फ्लेक्स उभे केले जाणार आहेत. कॅम्प येथील फिश मार्केट परिसरातही फ्लेक्स उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. खुल्या जागांवर फ्लेक्स उभारणी करून त्याद्वारे कॅन्टोन्मेंटचा महसूल वाढविला जाणार आहे. यापूर्वीचे कॅन्टोन्मेंट सीईओ विशाल सारस्वत यांनी फ्लेक्ससाठीच्या निविदा काढल्या होत्या. यापूर्वीही उभा मारुती कॉर्नर परिसर, पोलीस क्वॉर्टर्स या परिसरात मोठे फ्लेक्स होते. परंतु, कंत्राट घेतलेल्या कंपनीकडून वेळच्या वेळी कॅन्टोन्मेंटला पैसे दिले जात नसल्याने हे फ्लेक्स काढून टाकण्यात आले होते. थकबाकीदार फ्लेक्सधारकांना यापूर्वी काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे.