अस्वच्छ हॉटेल-फूड स्टॉलवर कॅन्टोन्मेंटची कारवाई
वर्षभरात लाखाचा दंड वसूल
► प्रतिनिधी/ बेळगाव
अस्वच्छ वातावरण, वैधता संपलेले खाद्यपदार्थ यावर कॅन्टोन्मेंट बोर्डने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याने ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 1 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डकडून उपलब्ध झाली आहे.
फूड स्टॉल, हॉटेल, बेकरी व खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या दुकानांवर कॅन्टोन्मेंटकडून कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता दुकानांवर कारवाई करून अस्वच्छ व वैधता संपलेले खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कॅम्प, तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी लहान-मोठे फूड स्टॉल असून ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अशा दुकानांवर कारवाई करण्यात आली.
काही दुकानांमध्ये झुरळ, पाली, उंदीर यांचा वावर दिसून आला. त्याचबरोबर दोन ते तीन दिवसांपासून साठवून ठेवलेले चिकन, मटण, मासे व इतर खाद्यपदार्थ अनेक ठिकाणी दृष्टीस पडले आहेत. अशा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. वारंवार अस्वच्छता आढळल्यास दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले जातील, असा इशारा कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत दिला आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खुल्या जागांवर नागरिकांकडून कचरा फेकला जात असल्याचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सांगितले. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा परिसर गलिच्छ होत आहे. यावर कॅन्टोन्मेंट सीईओंनी खुल्या जागांवर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले.