कॅन्टोन्मेंटने पार्किंगतळासाठी मागविल्या निविदा
खुल्या जागांचा होणार वापर
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड खुल्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था करून महसूल वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पार्किंगसाठी चार जागांची निश्चिती करण्यात आली आहे. यासाठी कॅन्टोन्मेंटने निविदा मागविल्या असून इच्छूक कंत्राटदारांनी 23 ऑक्टोबरपूर्वी अर्जदाखल करावयाचा आहे. कॅटल मार्केट, आरटीओ रोड, सेंट झेवियर्स हायस्कूल समोरील खुली जागा, बेवूर रोड, वेंगुर्ला रोड, लॉज रोड, क्लब रोड समोरील खुली जागा, त्याचबरोबर सीपीएड् मैदानावर कार्यक्रम असताना पार्किंगची व्यवस्था पाहणे, लिंगराज कॉलेज समोरील जागा, धर्मवीर संभाजी चौकापासून ओल्ड मोची लाईनपर्यंत तसेच नॉर्थ टेलिग्राफ रोड, पोस्ट ऑफिस रोड, रेल्वेस्टेशन समोरील दोन्ही बाजूला, रेल्वे बसस्टँड या परिसरात पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याशेजारी जागा मिळेल तेथे पार्किंग केले जात होते. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत होती. खुल्या जागांचा वापर पार्किंग तळासाठी केला जाणार असून यातून कॅन्टोन्मेंटला महसूलही मिळणार आहे.