किल्ला भाजी मार्केट परिसरात कॅन्टोन्मेंटकडून दुकान गाळ्यांची उभारणी
फूल बाजारही सुरू होणार : पार्किंगची सोय करणार, महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंटचा प्रयत्न
बेळगाव : किल्ला जुने भाजी मार्केट येथील खुली जागा मागील अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. या जागेवर आता बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने दुकाने उभारण्याचे काम सुरू केले आहे. भरतेश शिक्षण संस्थेसमोर दुकान गाळ्यांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. लवकरच या ठिकाणी हे दुकानगाळे सुरू होणार आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बेर्डने मागील काही दिवसांत खुल्या जागांचा वापर महसूल वाढीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी खुल्या जागांमध्ये पे अॅण्ड पार्कद्वारे महसूल उपलब्ध करून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेस्टेशन, खानापूर रोड, फिश मार्केटसह इतर परिसरामध्ये फ्लेक्स उभारण्यात आले. आता किल्ला भाजी मार्केट येथील खुल्या जागेत पार्किंग, तसेच दुकानगाळे उभारले जात आहेत.
जुने भाजी मार्केट इमारत वर्षभरापूर्वी जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून ही जागा वापराविना पडून होती. त्या जागेवर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर भरतेश शिक्षण संस्थेसमोरील जागेमध्ये सध्या ट्रक, बस, टेम्पोसह मोठी वाहने पार्किंग केली जात होती. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपातील दुकानगाळे तयार करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. दुकानगाळे तयार होत आले असून या ठिकाणी फूल बाजार सुरू होणार आहे. या दुकानांच्या पाठीमागील बाजूला मोठ्या वाहनांचे पार्किंग सुरूच ठेवले जाणार आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डला चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी निधीअभावी कॅन्टोन्मेंटमधील विकासकामे ठप्प झाली होती. परंतु अशा प्रकारे महसूल जमा झाल्यास विकासकामांना निधी अपुरा पडणार नाही.