कॅन्टोन्मेंट बोर्ड जुन्या वाहनांची विक्री करणार
रुग्णवाहिका, वॉटर टँकरसाठी होणार लिलाव
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डकडून जुनी वाहने विक्री केली जाणार आहेत. वापरात नसलेली वाहने विक्री करून त्याद्वारे आलेल्या रकमेतून नवीन वाहने खरेदी करण्याचा विचार कॅन्टोन्मेंट बोर्डचा सुरू आहे. त्यामुळे वॉटर टँकर व रुग्णवाहिका विक्री करण्यासाठी लिलाव केला जाणार आहे. 2000 साली खरेदी केलेला वॉटर टँकर सध्या किरकोळ दुरुस्तीमुळे बंद आहे. तसेच 2004 साली खरेदी केलेली टेम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका देखील विक्री केली जाणार आहे. दोन्ही वाहने वापरात नसल्यामुळे ती पडून आहेत. विक्रीतून आलेल्या निधीचा वापर नवीन वाहन खरेदीसाठी केला जाणार असल्याने जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. 12 ऑगस्टपूर्वी इच्छुकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर किल्ला येथील कॅन्टोन्मेंटच्या वॉर्ड क्र. 2 येथे कचरा उचल करण्यासाठी आऊटसोर्सिंगद्वारे निविदा मागवण्यात आल्या आहेत. कॅम्प हद्दीमध्ये कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांकडून कचरा उचल केली जाते. परंतु, किल्ला येथील कचऱ्याची उचल करणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आऊटसोर्सिंगद्वारेच वॉर्ड क्र. 2 मधील कचरा उचल केली जात आहे. वॉर्ड क्र. 1 ते 7 मधील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन घनकचरा जमा करणे, त्यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, त्याचबरोबर विघटनशील व अविघटनशील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे काम देण्यात आले आहे. 20 ऑगस्टपर्यंत इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे.