कॅन्टोन्मेंट बोर्डची उद्या मासिक बैठक
महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक बुधवार दि. 25 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीवेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटलमध्ये नवीन यंत्रसामग्री पुरविणे, त्याचबरोबर वाढीव कर्मचारी याबाबतही चर्चा केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विकासकामांना मंजुरी देण्याबरोबरच सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक बोलावली जाते. काही वेळा अधिकारी उपलब्ध नसतील तर बैठक पुढे ढकलली जाते.
मागील महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठी महत्त्वाच्या बैठका झाल्या होत्या. त्यानंतर आता प्रथमच मासिक बैठक घेण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंटकडून आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी घेतले जाणार आहेत. यासंदर्भात निविदाही मागवण्यात आल्या होत्या. कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा सातवा वेतन आयोग मिळावा, यासंदर्भातही चर्चा केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये ईसीजी मशीन, त्याचबरोबर शस्त्रक्रियेसाठी लागणारी इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढल्या जाणार आहेत. त्यामुळे बुधवारची होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.