महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घरपट्टी-पाणीपट्टीवरील सूट रद्द

11:21 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाणी उपसावर निर्बंध करण्यासह विविध कठोर निर्णय : मतदारयाद्या तयार करण्याच्याही सूचना

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ई-छावणीद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कर भरल्यानंतर यापूर्वी 5 टक्के सूट दिली जात होती. परंतु, यापुढे ही सूट दिली जाणार नसल्याचा निर्णय बुधवारी कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. 2021-2024 या काळात नागरिकांना 10 लाख 78 हजार 468 रुपयांची सूट देण्यात आली असून यापुढे ही सवलत बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत अनधिकृतरित्या पार्किंग केलेली वाहने, कॅम्पमधून सुरू असलेली अवजड वाहतूक यासोबत इतर विकासात्मक चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी होते. बैठकीत नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, उत्तरचे आमदार राजू सेठ, सीईओ राजीव कुमार यांनी सहभाग घेतला. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये पहिली ते दहावी वर्गात शिकत असलेल्या बीपीएल रेशनकार्डधारक व अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यापुस्तके वितरणासाठी 3 लाख 28 हजार रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. बोर्डने काही दिवसांपूर्वी कंत्राटी कामगारांसाठी निविदा मागविल्या होत्या. एकूण 171 कंपन्यांनी यासाठी बोली लावली होती. यामध्ये वन ग्रुप सोल्युशन यांना कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक जरी पुढे ढकलली  तरी मतदारयाद्या तयार करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. अशोक सर्कल ते मार्केट पोलीस स्टेशन, सर्किट हाऊस ते सेठ पेट्रोल पंप, आरटीओ सर्कल ते मार्केट पोलीस स्टेशन, कीर्ती हॉटेल ते त्रिवेणी हॉटेल या दरम्यानच्या रस्त्याचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला होता. हा रस्ता देखभालीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र पाण्याची कमतरता असल्याने पाणीपुरवठ्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना मर्यादितच पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. विनापरवाना कूपनलिकांची खोदाई केल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Advertisement

उद्यानांचा होणार विकास

बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील उद्यानांचा विकास स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या माध्यमातून केला जाणार आहे. बिकानेर मिठाईवाला तसेच कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य विक्रम पुरोहित यांच्याकडून उद्यानांचा विकास केला जाणार आहे. कोंडाप्पा स्ट्रीट येथील जुन्या विहिरीचे बेळगाव लायन्स क्लबतर्फे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कॅन्टोन्मेंट गेस्टहाऊसजवळ संरक्षक भिंत बांधकामासाठी 9 लाख 60 हजारांचा निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

वाहन पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

कॅन्टोन्मेंट बोर्डमधील खुल्या जागा तसेच रस्त्याशेजारी अनधिकृतरित्या वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेली वाहने, स्क्रॅप वाहने तसेच क्यावसायिक वाहने उभी केली आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहने पार्किंगसाठी व्यावसायिक वाहनांना कर द्यावा लागणार आहे. एका दिवसासाठी शंभर रुपये तर मासिक 1500 रुपये बोर्डकडे भरावे लागणार आहेत. तसेच स्क्रॅप वाहने पंधरा दिवसात न हलविल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ब्रिगेडियर मुखर्जी यांनी दिला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article