दहा रुपयाच्या नोटा मिळेनात...कुणी नाणी देता का नाणी
जे १० रुपयांचे नाणे पाहून नाक मुरडणारे व्यापारी आता चक्क १० रुपयाच्या नाण्याची मागणी बाजारपेठेत करताना दिसून येत आहेत. ते आमच्या कडे चालत नाहीत, इथे कोणीही घेत नाहीत, अशी बनावट नाणी बाजारपेठेत आहेत.अशी एक ना शंभर कारणे सांगून दहा रुपयांचे नाणे टाळण्याचा प्रयत्न करणारे व्यापारी मात्र आता ग्राहकांच्या कडे दहा रुपयाचे नाणी आहेत का ? अशी विचारणा करत आहेत.
बेळगाव सीमाभागात दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा गेल्या दोन तीन वर्षा पासून मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे याचा मोठा परिणाम बाजारपेठेत दिसून येत होता.अनेक भाजीपाला विक्रेते,चहागाडीवाले सर्व किरकोळ व मोठे दुकानदार तसेच छोटे मोठे व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात यामुळे रोज वादावादीचे प्रसंग निर्माण होत होते. तर सीमाभागातील काही व्यापारी हे व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्र हद्दीत देखील जात असतात. तिथे देखील हे व्यापारी तेथील ग्राहकांच्या कडून आमच्या कडे हे नाणे चालत नाही म्हणून आपला माल ग्राहकांना देण्यास सरळ नकार देत होते. यामुळे बाजारपेठेत भांडणे,वादावादी हि नित्याचीच बनली होती.
पण सध्या बाजारात दहा रुपयांच्या कागदी नोटेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने कुणी नाणी देता का नाणी म्हणण्याची वेळ आता व्यापाऱ्यांच्या वर आली आहे.दहा रुपयाचे नाणे पाहून नाक मुरडणारे व्यापारीच आता दहा रुपयांच्या नाण्याची विचारणा करत असलयाने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.