नरभक्षण करणारा समुदाय
झाडांवर असते वास्तव्य, बाहेरील जगापासून दूर
पृथ्वीवरील दुर्गम भागांमध्ये वसलेल्या समुदायांबद्दल अनेक रहस्यं कायम आहेत. या समुदायांचे राहणीमान आणि परंपरा आजही रहस्यापेक्षा कमी नाहीत. असाच एक समुदाय इंडोनेशियाच्या पापुआ प्रांताच्या घनदाट जंगलात राहतो. या समुदायाला कोरोवाई हे नाव प्राप्त आहे. समुदायाचे लोक झाडांवर घर तयार करतात आणि चकित करणारी बाब म्हणजे यांना नरभक्षी मानले जाते. त्यांची लाइफस्टाइल, अनोख्या परंपरा आणि बाहेरील जगाशी संपर्क नसणे त्यांना असाधारण स्वरुप प्रदान करते.
कोरोवाई समुदायाविषयी जगाला पहिल्यांदा 1974 मध्ये माहिती मिळाली. एका डच मिशनरीने हिंमत करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे पाऊल उचलले. त्यापूर्वी या प्राचीन समुदायाविषयी कुणीच जाणत नव्हता. हा संपर्क एक ऐतिहासिक क्षण ठरला, यामुळे या समुदायाचे दरवाजे बाहेरील जगासाठी खुले झाले. प्रारंभिक शोधानंतर येथे संशोधक, पत्रकार आणि काही पर्यटकांची ये-जा वाढत गेली. परंतु बाहेरील लोकांच्या या क्षेत्रातील वावरामुळे काही नकारात्मक प्रभावही पडले आणि 90 च्या दशकात या भागात वेश्यावृत्तीसारख्या समस्याही वाढू लागल्या. इंडोनेशियन सरकारचा सक्रीय पुढाकार आणि स्थानिक प्रशासनाच्या ठोस प्रयत्नानंतर 1999 पर्यंत अशाप्रकारच्या अनैतिक कृत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
झाडांवर वसलेले जीवन
बाहेरील जगाशी संपर्क वाढूनही कोरोवाई समुदायाचे बहुतांश लोक जमिनीपासून 6-12 मीटरच्या उंचीवर झाडांवर तयार केलेल्या घरांमध्ये राहतात. स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांची ही एक अनोखी रणनीति आहे. हे उंच घर केवळ बाहेरील आक्रमणापासून बचाव करत नाहीत, तर स्थानिक मान्यतांनुसार त्यांना वाईट आत्म्यांपासून (खखुआ) वाचवितात. ही घरं मजबूत झाड किंवा खांबांवर स्थानिक सामग्रीद्वारे निर्माण केले जाते. उदरनिर्वाहासाठी हे लोक मुख्यत्वे शिकारीवर निर्भर आहेत आणि त्यांचा निशाणा अत्यंत अचूक असतो. ते रानडुक्कर, कस्कस यासारख्या प्राण्यांची शिकार करतात आणि सगो पामला स्वत:चे मुख्य भोजन मानतात.
नरभक्षण अन् अंधश्रद्धा
कोरोवाई समुदाय ज्या क्षेत्रात वास्तव्य करतो, ते अराफुरा समुद्रापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. या लोकांवर अनेक माहितीपट तयार झाले असून यात रहस्यमय राहणीमान आणि कथित नरभक्षण प्रथांविषयी उल्लेख आहे. त्यांच्या विश्वास प्रणालीचा एक केंद्रीय हिस्सा ‘खखुआ’ची अवधारणा आहे. जर कुठलाही व्यक्ती रहस्यमय आजाराने मृत्युमुखी पडला, तर त्यामागे खखुआ असतो, म्हणजेच एक दुष्ट जादूगार मृताच्या शरीरात प्रवेश करून त्याला खात असतो. या खखुआला न्याय मिळवून देण्यासाठी मृताच्या शरीराला खाल्ले जावे असे या समुदायाचे मानणे आहे. या नरभक्षणाला बदल्याची भावना आणि त्यांच्या न्यायप्रणालीचा हिस्सा मानले जाते. परंतु ही प्रथा बाहेरील जगाशी संपर्क वाढल्याने आता कमी झाली आहे.