बंगारप्पानगर शिरवाड येथे कँडल मार्च
आत्महत्या केलेल्या मारुती नाईक यांना वाहिली श्रद्धांजली : हजारो नागरिकांचा सहभाग
कारवार : येथून जवळच्या बंगारप्पानगर शिरवाड येथील आत्महत्या केलेल्या मारुती नाईक यांना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर मौन कँडल मार्च काढण्यात आला. यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. हिंदुत्ववादी कार्यकर्ता मारुती नाईक यांनी 20 ऑक्टोबर रोजी स्वत:ला दलित नेता समजणाऱ्या एलीषा एलकपाटी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या त्रासाला आणि कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी (सीपीआय व उपनिरीक्षक) केलेल्या छळाला वैतागून आत्महत्या केली होती. गुरुवारी संध्याकाळी कारवार नगरपालिकेजवळच्या महात्मा गांधीजीच्या पुतळ्याजवळ जमा झालेल्या हजारो नागरिकांनी पहिल्यांदा मारुती नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर कारवार शहराच्या मुख्य रस्त्यावरून मौन कँडल मार्च काढण्यात आला.
या प्रकरणी एलीषा एलकपाटी आणि त्याचे सहकारी बसवराज वाल्मिकी आणि सुरेश नाईक यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. कँडल मार्चच्यावेळी हिंदू धर्मविरोधी एलकपाटी याला येथून हद्दपार करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुसुमाधर, उपनिरीक्षक शांतीनाथ आणि पोलीस कर्मचारी मंजुनाथ यांनाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाने समाधान न झालेल्या जनतेने या पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. कँडल मार्चमध्ये जनशक्ती मंचचे अध्यक्ष आणि समाजसेवक माधव नाईक, युवा नेता राघू नाईकसह अनेकजण सहभागी झाले होते. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मारुती नाईक यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयाचे सांत्वन केले.