वृत्तसंस्था /चेन्नई
इतिहास घडवणारा किशोरवयीन भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश टोरंटो येथील प्रतिष्ठेची कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून जागतिक विजेतेपदाचा सर्वांत तऊण आव्हानवीर ठरल्यानंतर गुऊवारी येथे परतला तेव्हा चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. गुकेश ज्या विद्यालयात शिकतो त्या वेलमल विद्यालयातील शेकडो विद्यार्थी या बुद्धिबळातील 17 वर्षांच्या प्रतिभावंताचे स्वागत करण्यासाठी आले होते आणि तो प्रवास करत असलेले विमान उतरण्याच्या किमान एक तास आधीपासून विमानतळावर ते रांगेत उभे होते. गुकेशच्या आगमनाची वेळ जवळ आल्यानंतर झुंबड उडून बाहेर पडण्याच्या गेटच्या आजुबाजूचा परिसरात काही वेळेतच गर्दी झाली. पहाटे 3 च्या सुमारास गुकेश बाहेर आला आणि आनंदी जनसमुदायाने त्याला लगेच गराडा घातला. पोलिसांनी त्याला सुखरूप बाहेर काढताना धक्काबुक्कीही झाली. यावेळी त्याचे अभिनंदन करताना त्याच्या गळ्यात हार घालण्यात आले.
‘घरी परतताना मला खूप आनंद होत आहे. ही एक विशेष कामगिरी आहे. स्पर्धेच्या सुऊवातीपासूनच मी चांगल्या स्थितीत होतो. मला पूर्ण विश्वास होता की, मी या स्पर्धेत अव्वल ठरेन आणि नशीबही माझ्या बाजूने राहिले’, असे गुकेशने विमानतळावर माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘इतके लोक बुद्धिबळाचा आनंद घेतात हे पाहणे चांगले आहे. मी तामिळनाडू सरकारचे आभार मानतो. तसेच मी माझे अप्पा, अम्मा, प्रशिक्षक, मित्र, कुटुंबीय, प्रायोजक आणि माझ्या शाळेचे आभार मानतो. त्यांनी मला साथ दिली आणि मला स्पर्धा जिंकण्याकामी मदत करण्यात अप्रतिम भूमिका बजावली’, असे तो पुढे म्हणाला. गुकेशची आई पद्मा, ज्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, त्या कुटुंबातील इतर काही सदस्यांसह त्याचे स्वागत करण्यासाठी येथे आल्या होत्या. गुकेशने तिला गर्दीत पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर गुकेशने आईला मिठी मारली. गुकेशचे वडील रजनीकांत, जे ईएनटी सर्जन आहेत, त्यांनी आपल्या मुलासाठी सेवा सोडली होती. ते या स्पर्धेसाठी मुलासोबत टोरंटोला गेले होते. ‘आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. आम्हाला या यशाचे महत्त्व उमजण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. कारण आतापर्यंत आम्ही खूप व्यस्त राहिलेलो आहोत’, असे रजनीकांत आगमनानंतर म्हणाले.