Solapur : सोलापुरात पहिल्याच दिवशी उमेदवारांनी फिरवली पाठ
सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपालिका व नगरपंचायतीसाठी निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू
सोलापूर : जिल्ह्यातील ११ नगरपालिका व १ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवार ११पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळले. केवळ पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाने अर्ज दाखल केला असल्याची माहिती नगरपरिषद विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके यांनी दिली.
१७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. १८ रोजी अर्जाची छाननी व अर्ज माघारीसाठी २१ पर्यंत मुदत आहे. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.जिल्हा प्रशासनानेही या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठीची तयारी केली आहे. १२ नगर पालिकांसाठी ४ लाख ४३६०५ मतदार मतदार आहेत.
१२ नगरपालिकेतील एकूण १५२ प्रभागात २८९ नवे नगरसेवक ३ डिसेंबरला नगरपालिकांमध्ये येतील. प्रत्येकी २० नगरसेवकांच्या निवडीसाठी दुधनी, मैंदर्गी, अकलूज, मोहोळ, सांगोला, कुर्जुवाडी, करमाळा या नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. अ वर्गातील बार्शी नगरपालिकेसाठी एकूण २१ वॉर्ड आहेत. तिथे ४२ नगरसेवकांच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. ब वर्गातील अक्कलकोट नगरपरिषदेच्या २५, पंढरपूर नगरपालिकेच्या ३४ नगरसेवक निवडीसाठी निवडणुका घेण्यात येत आहेत. तर अनगर नगरपंचायतीच्या १७ सदस्यांच्या निवडीचीही निवडणूक प्रक्रिया होत आहे.