प्रादेशिक सेना भरतीत आज बेळगावच्या उमेदवारांना संधी
शहरातील लॉज, हॉटेल फुल्ल : बेळगावसह 10 जिल्ह्यांतील उमेदवार सहभागी होणार : कॅम्प परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रादेशिक सेनेच्यावतीने (टेरिटोरियल आर्मी) बेळगावमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवार दि. 23 रोजी बेळगावसह कर्नाटकातील दहा जिल्ह्यांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच बेळगावमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली. शहरातील लॉज,
हॉटेल उमेदवारांनी फुल्ल झाल्याचे दिसून आले.
15 नोव्हेंबरपासून कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या समोरील मैदानावर प्रादेशिक सेनेच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, गोवा, केरळ, तामिळनाडू, तसेच केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना संधी देण्यात आली. शुक्रवारपासून कर्नाटकातील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. शुक्रवारी कोप्पळ, धारवाड, चिक्कबळ्ळापूर, कोलार, तुमकूर, चित्रदुर्ग, कोडगू, गुलबर्गा, बळ्ळारी, बिदर व चिक्कमंगळूर अशा अकरा जिल्ह्यांतील उमेदवार उपस्थित होते.
शनिवारी मंड्या, रामनगर, म्हैसूर, बेंगळूर, बागलकोट, हासन, कारवार, चामराजनगर, मंगळूर या जिल्ह्यांमधील उमेदवारांना संधी देण्यात आली. यामुळे मागील दोन दिवसांत शहरामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. रेल्वे, बसने उमेदवार शहरात दाखल होत आहेत. एक दिवस आधी आलेले उमेदवार शहरातील लॉज, हॉटेल या ठिकाणी आसरा घेत असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी बेळगाव जिल्ह्यासह उडुपी, दावणगेरे, शिमोगा, रायचूर, गदग, हावेरी, विजापूर, यादगिर व विजयनगर या दहा जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून शहरात गर्दी होण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी होणारी गर्दी लक्षात घेऊन कॅम्प परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भरतीच्या ठिकाणीही ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.