कँडिडेट्स बुद्धिबळ : भारतीय शर्यतीत, पण नेपोम्नियाचीचे वर्चस्व
वृत्तसंस्था / टॉरंटो
कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद या भारतीय जोडीने सुऊवातीच्या वादळाचा सामना करताना आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केली आहे या प्रतिष्ठित स्पर्धेत मंगळवार हा पहिला विश्रांतीचा दिवस राहिला. भारतीय खेळाडूंना जेतेपदाचे भक्कम दावेदार कधीच मानले गेले नव्हते. तरीही गुकेश आणि प्रज्ञानंदनेही चांगल्या प्रकारे तोंड दिलेले आहे.
तथापि, विदित गुजराथीबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुराविऊद्धच्या शानदार विजयानंतर चर्चेत आला हाता. या स्पर्धेतील 14 पैकी चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून अजून 10 सामने खेळायचे बाकी आहेत. भारतीयांसाठी घडामोडी चांगल्या घडलेल्या असल्या, तरी त्या खूपच चांगल्या म्हणता येणार नाहीत. रशियाच्या इयान नेपोम्नियाचीला आपल्या देशाविऊद्धच्या निर्बंधांमुळे ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळावे लागले असून तो चारपैकी तीन गुण मिळवून गुणतालिकेत शीर्षस्थानी ठामपणे बसला आहे.
याहून चांगल्या सुरुवातीची नेपोम्नियाचीने आशा केलेली नसेल. गुजराथी आणि फ्रान्सच्या फिरोझा अलीरेझाविऊद्धचे विजय आणि दोन बरोबरीसह तो आघाडीवर असून जगज्जेतेपदासाठी झुंजण्याची संधी तिसऱ्यांदा त्याला मिळू शकते. पण इतिहासाचा विचार केल्यास सलग तीन वेळा कोणालाही कँडिडेट्स स्पर्धेचे जेतेपद मिळालेले नाही. पांढऱ्या सोंगट्यासह खेळताना नोंदविलेल्या दुसऱ्या विजयानंतर नेपोम्नियाची हा या स्पर्धेतील आघाडीवर असलेला एकमेव खेळाडू बनला आहे आणि त्याच्यापाठोपाठ असलेले फॅबियानो काऊआना आणि गुकेश यांचे प्रत्येकी 2.5 गुण झाले आहेत.
काऊआना अजूनही त्याचा इतिहास पाहता एक धोकादायक स्पर्धक आहे. तथापि, भक्कम दावेदार मानला जाऊनही आणि अव्वल मानांकित असूनही त्याला हवे तसे वर्चस्व गाजविता आलेले नाही. चौथ्या स्थानावर असलेला प्रज्ञानंदही फार मागे नसून त्याचे दोन गुण झाले आहेत, तर गुजराथी, आबासोव्ह, अलीरेझा आणि नाकामुरा यांचे प्रत्येकी 1.5 गुण झाले आहेत. प्रज्ञानंदसमवेत त्याची आई नागलक्ष्मी ही नेहमीप्रमाणे आली असून तिला तो मोठा भावनिक आधार मानतो. खोलीत बरोबर कोणीतरी असणे महत्वाचे असते, विशेषत: जेव्हा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो तेव्हा. मी तिच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे, असे प्रज्ञानंदने फिडेच्या अधिकृत वेबसाइटशी संवाद साधताना सांगितले.