‘त्या’ काँग्रेस खासदाराचे सदस्यत्व रद्द करा
भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : काँग्रेसच्या विरोधात निदर्शने
बेळगाव : झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कंपनी आणि निवासस्थानी धाड टाकून काळा पैसा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या बेहिशेबी 350 कोटीहून अधिक मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. अशा भ्रष्टाचारी खासदाराचे सदस्यत्व रद्द करून कारवाई करावी, अशी मागणी भाजप बेळगाव महानगरपालिका आणि ग्रामीण विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी, देश विरोधी आणि हिंदु विरोधी आहे, अशा घोषणा देत काँग्रेस सरकारच्या विरोधात निदर्शने केली. काँग्रेस खासदाराकडे बेहिशेबी घबाड सापडले आहे. प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरू आहे. यावरून काँग्रेसमध्ये किती भ्रष्टाचार आहे, हे समोर येते. राज्यातही हे भ्रष्टाचारी सरकार गॅरंटी योजनांचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहे. बेहिशेबी मालत्तमा जमा केलेल्या धीरज साहू यांच्यावर कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, एम. बी. जिरली, मुरगेंद्रगौडा पाटील यांसह भाजप कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.