कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ
वृत्तसंस्था/ओटावा
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे अडचणीत सापडले आहेत. कॅनडातील सत्तारुढ पक्ष लिबरल पार्टीच्या खासदारांची बैठक झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान ट्रुडो यांच्या लिबरल नेत्याच्या स्वरुपात राजीनाम्याची अंतर्गत मागणी तीव्र झाली आहे. असंतुष्ट खासदारांनी ट्रुडो यांना स्वत:च्या तक्रारी ऐकविल्या आहेत. ही बैठक साप्ताहिक कॉकस मीटिंगचा हिस्सा होती, जी हाउस ऑफ कॉमन्सच्या सत्रादरम्यान आयोजित होते. ट्रुडो हे मागील अनेक महिन्यांपासून भारताच्या विरोधात मोहीम राबवू पाहत आहे.
कॅनडा सरकारने भारतीय राजनयिकांना लक्ष्य करत भारताच्या विरोधात सातत्याने वक्तव्ये केली आहेत. परंतु ट्रुडो आता स्वत:च्या देशातच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याच पक्षाचे खासदार त्यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याची मागणी करत आहेत. ट्रुडो यांच्या नावावर निवडणूक लढविली तर पक्ष पराभूत होईल अशी भीती या खासदारांनी व्यक्त केली आहे. असंतुष्ट लिबरल खासदारांनी ट्रुडो यांना 28 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. 24 खासदारांनी ट्रुडो यांच्याकडून लिबरल नेतेपदाचा राजीनामा मागणाऱ्या एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे. तर सुमारे 20 खासदारांनी आगामी निवडणुकीपूर्वी ट्रुडो यांनी पद सोडावे असा आग्रह धरला आहे. तर काही खासदारांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.
भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण
कॅनडा आणि भारताचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. ट्रुडो यांनी मागील वर्षी संसदेत निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केल्यावर द्विपक्षीय संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली होती. कॅनडाचे आरोप फेटाळत भारताने कॅनडावर कट्टरवादी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय पुरविण्याचा आरोप केला आहे.