इराणमध्ये गोळीबारात 10 पोलिसांचा मृत्यू
इस्रायलच्या हवाई हल्ल्यादरम्यान इराणसाठी दुहेरी संकट
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणच्या अशांत दक्षिणेकडील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात शनिवारी इराणी पोलीस अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यात किमान 10 पोलीस ठार झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत गटाकडून झालेल्या या हल्ल्यामुळे इराणसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 1,200 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहर कुह येथे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी सुरक्षा ताफ्यावर गोळीबार केला. हल्ल्यात सुरक्षा दलाच्या दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. देशाचे गृहमंत्री इस्कंदर मोमेनी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यातील कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही. शनिवारी सकाळी इराणमध्ये इस्रायलने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.