कॅनडाच्या मॅकेन्टोशला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/नेनटेरी(फ्रान्स)
कॅनडाची महिला जतरणपटू 17 वर्षीय समर मॅकेन्टोशने 400 मी. वैयक्तिक मिडले जलतरण प्रकारात पहिले सुवर्णपदक पटकाविले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील जलतरण या क्रीडा प्रकाराला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मॅकेन्टोशने आपल्या देशाला पहिले पदक मिळवून देताना रौप्य मिळविले होते.
कॅनडाची जलतरणपटू मॅकेन्टोशने महिलांच्या 400 मी. फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदकही घेतले. तिचे या क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. 400 मी. फ्रीस्टाईल प्रकारात अॅरेमी टिटमसने सुवर्णपदक तर केटी लेडेकीने कास्यपदक घेतले. 400 मी. वैयक्तिक मिडले प्रकारात तिने 4 मिनिटे, 27.71 सेकंदाचा अवधी घेतला. गेल्या मे महिन्यात झालेल्या कॅनडाच्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत या क्रीडा प्रकारात मॅकेन्टोशने 4 मिनीटे 24.38 सेकंदाचा अवधी नोंदविला होता. वयाच्या 14 व्या वर्षी मॅकेन्टोशने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. कॅनडाची मॅकेन्टोश आता जलतरण प्रकारातील 200 मी. बटरफ्लाय आणि 200 मी. वैयक्तिक मिडले प्रकारात सहभागी होणार आहे. ग्रिमेसने या क्रीडा प्रकारात 4 मिनिटे 33.40 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक मिळविले. तसेच अमेरिकेच्या इमा वेअँटने कास्य पदक घेतले.
रुमानियाच्या पोपोव्हिकला सुवर्ण
पुरूषांच्या 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात रुमानियाच्या 19 वर्षीय डेव्हिड पोपोव्हिकने अमेरिकेच्या हॉबसनला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविताना 1 मिनिट 44.72 सेकंदाचा अवधी घेतला. ब्रिटनच्या डंकन स्कॉटने कास्यपदक मिळविले.
इटलीला दुसरे सुवर्ण
पुरूषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात थॉमस सिकॉनने इटलीला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. सिकॉनने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविताना 52.00 सेकंदाचा अवधी घेतला. चीनच्या झू जियावूने या क्रीडा प्रकारात 52.32 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर 29 वर्षीय मर्फीने 52.39 सेकंदाचा अवधी घेत कास्य पदक मिळविले. सिकॉनने जलतरणमध्ये 100 मी. ब्रेस्टट्रोक प्रकारात रविवारी इटलीला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये ऑस्ट्रेलियाची कायली मॅकॉन आणि अमेरिकेची रिगन स्मिथ यांनी अंतिम फेरी गाठली आहे.