कट्टरवादी इस्रायली नागरिक, हमास नेत्यांवर बंदी घालणार कॅनडा
वृत्तसंस्था/ ओटावा
पॅलेस्टाइनच्या हिस्स्यातील क्षेत्रावर कब्जा करणारे इस्रायली नागरिक आणि हमास नेत्यांवर बंदी घालणार असल्याचे कॅनडाच्या विदेशमंत्री मेलानी जॉली यांनी म्हटले आहे. कॅनडाचे सरकार सक्रीय स्वरुपात या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. जॉली यांनी अलिकडेच युक्रेनचा दौरा करत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
आम्ही कट्टरवादी सेटलर्सवर बंदी घालणार आहोत. तसेच हमासच्या नेत्यांवरही नवे निर्बंध लादणार आहोत असे जॉली यांनी सांगितले आहे. वेस्ट बँकेत अवैध स्रुपात स्थायिक होणाऱ्या इस्रायली नागरिकांच्या विरोधात निर्बंधा लादण्याचा विचार केला जात आहे. वेस्ट बँकेत जमीन बळकाविण्यासाठी केली जात असलेली हिंसा अस्वीकारार्ह असून यामुळे क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात येऊ शकते. द्विराष्ट्र तोडग्याच्या दिशेने वाटचाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अलिकडेच म्हटले होते.
युद्ध संपुष्टात आणण्याचा मार्ग शोधण्यासाठी कॅनडा समर्पित आहे. तसेच वादावर तोडगा काढण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. ओलिसांची मुक्तता करण्यासाठी करार व्हावा अशी आमची इच्छा आहे. तसेच गाझामध्ये मदतसामग्री पोहोचविली जावी असे जोली यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासवरील निर्बंध कठोर केले आहेत. मागील आठवड्यात अमेरिकेने हमासवर नवे निर्बंध लागू केले आहेत. तसेच वेस्ट बँकेत वाढत असलेल्या हिंसेवरही अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. वेस्ट बँकेत कट्टरवादी इस्रायली नागरिकांना वसविले जात आहे. 2023 मध्ये अशा सेटलर्सच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पाश्चिमात्य देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.