कॅनडा, जर्मनी हॉकी संघ मदुराईत दाखल
वृत्तसंस्था / मदुराई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे होणाऱ्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेची पूर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होणारे कॅनडा आणि विद्यमान विजेत्या जर्मनीचे हॉकी संघ रविवारी येथे दाखल झाले. जर्मनीने 2023 च्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळविताना कौलालंपूरमध्ये झालेल्या लढतीतील अंतिम सामन्यात फ्रान्सच्या 2-1 असा पराभव केला होता.
तामिळनाडूमध्ये होणाऱ्या 2025 च्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश राहील. विद्यमान विजेत्या जर्मनी संघाचे नेतृत्व बेन हेसबॅचकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ विविध गटामध्ये विभागण्यात आले आहेत. अ गटामध्ये कॅनडा, द. आफ्रिका, आयर्लंड, जर्मनी यांचा समावेश आहे. जर्मनीचा या स्पर्धेतील सलामीचा सामना द. आफ्रिकाबरोबर 28 नोव्हेंबरला तर त्यांचा दुसरा सामना कॅनडाबरोबर 29 नोव्हेंबरला खेळविला जाणार आहे. 2013 साली नवी दिल्लीमध्ये झालेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत जर्मनीने सुवर्णपदक मिळविले होते. तर 2021 च्या भुवनेश्वरमधील स्पर्धेत त्यांनी रोप्य पदक तर 2016 च्या लखनौमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक घेतले होते. कोरियाचा सलामीचा सामना फ्रान्सबरोबर 29 नोव्हेंबरला होईल. कोरियाचा फ गटात समावेश असून या गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.