For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खलिस्तानी कट्टरवादाचा धोका कॅनडाला मान्य

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
खलिस्तानी कट्टरवादाचा धोका कॅनडाला मान्य
Advertisement

राष्ट्रीय सुरक्षेसाठी ठरविले मोठा धोका : कारवाई होण्याची शक्यता : भारताच्या दीर्घकालीन प्रयत्नांना यश

Advertisement

वृत्तसंस्था/ओटावा

खलिस्तानी दहशतवादी कॅनडात बसून भारतात हिंसा फैलावत असल्याचे अखेर कॅनडाने मान्य केले आहे. कॅनडाच्या एका महत्त्वपूर्ण गुप्तचर अहवालात खलिस्तानी कट्टरवाद्यांना कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक संबोधिण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्यांना अधोरेखित करणारा अन् संसदेत सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात कॅनेडियन सुरक्षा गुप्तचर सेवेने (सीएसआयएस) खलिस्तानसमर्थक भारताला लक्ष्य करत हिंसक कारवायांना बळ देणे, निधी पुरविणे आणि भारतविरोधी कटासाठी कॅनडाच्या भूमीचा सातत्याने वापर करत असल्याचे म्हटले आहे. तसेच कॅनडाने पहिल्यांदाच खलिस्तान समर्थकांसाठी ‘कट्टरवादी’ शब्दाचा वापर केला आहे.

Advertisement

2024 मध्ये कॅनडात कुठल्याही कॅनडा-आधारित खलिस्तानी कट्टरवाद्यांशी संबंधित हल्ला झाला नाही, परंतु खलिस्तानी कट्टरवाद्यांचा हिंसक कारवायांमध्ये सामील असणे कॅनडा व कॅनेडियन हितांसाठी राष्ट्रीय सुरक्षा धोका ठरला असल्याचे अहवालात गुप्तचर सेवेने म्हटले आहे. खलिस्तानी कट्टरवादाशी निगडित व्यक्ती आणि नेटवर्क कॅनडात सक्रीय असल्याचे अहवालात नमूद आहे. मागील आठवड्यात खलिस्तानी कट्टरवाद्यांनी जी-7 च्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना धमकी दिली होती.

खलिस्तानींसाठी कॅनडा ठरला तळ

खलिस्तानी कट्टरवादी मुख्यत्वे भारतात हिंसा घडवून आणणे, त्याकरता निधी जमविणे आणि त्याचा कट रचण्यासाठी कॅनडाला तळाच्या स्वरुपात वापर करत राहिल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. कॅनडात खलिस्तान समर्थक समुहांचे अस्तित्व आणि कारवायांवरून भारत अन् कॅनडादरम्यान तणावाची स्थिती असताना हा अहवाल समोर आला आहे. भारताने मागील काही वर्षांमध्ये खलिस्तानी कट्टरवाद्यांना कॅनडात स्थान मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मोदी-कार्नी भेटीची पार्श्वभूमी

भारताने वारंवार कॅनडाला खलिस्तानी कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. तसेच भारताने 20 हून अधिक फरार गुन्हेगारांची यादी प्रत्यार्पणासाठी सोपविली असून यातील अनेक जण दहशतवाद आणि हिंसेप्रकरणी वाँटेड आहेत. खलिस्तानी कट्टरवादाच्या धोक्याला कॅनडाने मान्य केल्याने भारताच्या दीर्घकालीन प्रयत्नांना यश मिळाले आहे. ही घडामोड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात अल्बर्टा येथे जी-7 शिखर परिषदेरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या दुसऱ्या दिवशी घडली आहे. या पार्श्वभूमीवर समोर आलेला अहवाल भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. 1980 च्या दशकाच्या मध्यात राजकारणाने प्रेरित हिंसक कट्टरवादाची सुरुवात कॅनडात असलेल्या खलिस्तानी कट्टरवाद्यांपासून झाल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

मोदींच्या दौऱ्यानंतर बदलली स्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच कॅनडाचा दौरा करत जी-7 शिखर परिषदेत भाग घेतला आहे. 2023 मध्ये कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले होते. कॅनडाच्या तपास यंत्रणांनी निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. तर भारत सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. भारतविरोधी घटकांना कॅनडाकडून बळ पुरविले जात असल्याचा आरोप भारताने केला होता. परंतु कॅनडात आता मार्क कार्नी यांचे सरकार सत्तेवर आल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारू लागले आहेत.

Advertisement
Tags :

.