हल्याळ-बापेली तपासणी नाक्यावर 8 लाखाचे प्रचार साहित्य जप्त
कारवार : हल्याळ विधानसभा मतदारसंघातील बापेली (ता. जोयडा, बेळगाव-कारवार) तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली असता 8 लाख रुपये किमतीचे राजकीय पक्षाचे निवडणूक प्रचार साहित्य जप्त केले. कोणत्याही कागदपत्राशिवाय या साहित्याची वाहतूक करण्यात येत होती. म्हणून ही कारवाई केली आहे. या प्रकरणाची नोंद जोयडा पोलीस ठाण्यात करून संबंधितांवर एफआयआर दाखल केले आहे. शनिवारी जोयडा तालुक्यातील अनमोड तपासणी नाक्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणात 6 लाख 48 हजार 500 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ही कारवाई आचारसंहितेचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आणि पोलिसांनी केली होती. दरम्यान कारवार जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून आजअखेर 2 कोटी 7 लाख 88 हजार 686 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ऐवजामध्ये रोख रक्कम, दारू, गांजा, दुचाकी 16, अवजड वाहने दोन, चारचाकी वाहने चार, साड्या आणि चुडीदार व भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्याचा समावेश आहे.