रोहयो सक्षमीकरणासाठी अभियान
गावोगावी ठेवल्या सूचना पेट्या : सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : रोजगार हमी योजनेबाबत जागृती व्हावी आणि सर्व रोहयोंना काम उपलब्ध व्हावे यासाठी रोजगार हमी सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. तालुक्यातील 57 ग्रा. पं. कार्यक्षेत्रात या अभियानाला चालना देण्यात आली आहे. या अंतर्गत अंगणवाडी, वाचनालय, दूध केंद्र, रेशन दुकान आदी ठिकाणी सूचना पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये रोहयोंनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात टाकायच्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात या सूचना पेट्या बसविण्यात आल्या आहेत. याठिकाणी रोहयोअंतर्गत कामे पाहिले असल्यास या सूचना पेटीत यासंबंधीचा अर्ज टाकावा लागणार आहे.
रोहयो कामगारांना पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने 57 ग्रा. पं. कार्यक्षेत्रात या पेट्या बसविण्यात आल्या आहेत. त्याबरोबर गावोगावी जाऊन रोजगार हमी योजनेबाबत जागृती केली जात आहे. तसेच कामाची पाहणीही होत आहे. यंदाच्या वर्षात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक ग्रा. पं. मध्ये 50 गोठ्यांची कामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रोहयो योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. तसेच पात्र कुटुंबातील स्त्री-पुरुष लाभार्थ्यांना प्रति दिवस 349 रुपये मजुरी निश्चित करण्यात आली आहे. कामाचा कालावधी, वैयक्तिक सुविधा आणि योजनेंतर्गत उपलब्ध असलेले हक्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी कामाची वेळ, याबाबतही जागृती केली जात आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रोहयोंसाठी 8277506000 ही हेल्पलाईन उपलब्ध करण्यात आली आहे.