For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळग्रस्त केनियात गायींची जागा घेत आहेत उंट

06:10 AM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळग्रस्त केनियात गायींची जागा घेत आहेत उंट
Advertisement

केनियाच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये उंट आता गायींचे साथीदार ठरत आहेत. 2015 मध्ये सांबुरू काउंटीच्या अधिकाऱ्यांनी एक खास कार्यक्रम सुरू केला होता. त्यापूर्वी तेथे दुष्काळ पडला होता, यामुळे केनियाच्या शुष्क भागांमध्ये कमीतकमी 70 टक्के गायींचा मृत्यू झाला होता. या गायींच्या मृत्यूमुळे स्थानिक पशूपालकांच्या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता उंट या समस्येवर उपाय ठरत आहेत. हे प्राणी दुष्काळातही जिवंत राहतात आणि समुदायाला दूध पुरवत आहेत.

Advertisement

 

सांबुरु काउंटीत कॅमल प्रोग्रामची सुरुवात 2015 मध्ये झाली. याच्या अंतर्गत सोमाली उंटांची प्रजाती स्थानिकांना पुरविण्यात आली. हे उंट स्थानिक उंटांपेक्षा मोठे आणि अधिक दूध देणारे असतात. आतापर्यंत सुमारे 5 हजार सोमाली उंट वितरित करण्यात आले आहेत. काउंटीच्या प्रत्येक परिवाराकडे स्वत:चा उंट असावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक परिवाराला उंट मिळाल्यास जीवन सुलभ होणार असल्याचे गावाचे प्रशासक जेम्स लोल्पुसिके यांनी सांगितले आहे. लोल्पुसिके नावाच्या एका पशुपालकाला 2023 मध्ये उंट मिळाले. प्रथम त्यांना उंटांविषयी काही माहित नव्हते. आता त्यांच्या गावातील छोट्या छोट्या घरांचे भाग ज्याला ‘मॅन्याटा’ म्हटले जाते, तेथे 12 हून अधिक उंट आहेत. हे उंट झाडीदार सवानामध्ये आरामात राहतात, लोल्पुसिकेचे नातेवाईक जेम्स लोल्पुसिके हे गावाचे प्रशासक असून त्यांनी उंटांमुळे भागात स्पष्ट बदल दिसून येत असून मुलांची प्रकृती उत्तम होत असल्याचे सांगितले आहे.

 

उंटांमधून दिवसात 4-5 वेळा दूध मिळविले जाऊ शकते. याचमुळे लोक त्यांना अत्यंत पसंत करत आहेत. उंटांचे दूध मानवी दूधासारखेच पौष्टिक आणि औषधीय गुणधर्मांनी युक्त असते. केनियाच्या मेरू विद्यापीठाच्या 2022 च्या एका अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. दुष्काळाच्या काळात पशुपालकांच्या समुदायांमध्ये उंटाचे दुध निम्म्याहुन अधिक पोषण देते. हे दूध व्हिटॅमिन आणि प्रोटीनने भरपूर असते. यामुळे कुपोषणाची समस्या कमी होत आहे. दुष्काळातही उंट दूध देतात, तर गायींचा मृत्यू होत असतो, असे पशुपालकांचे सांगणे आहे. परंतु उंटांच्या कळपाला आजारांचा धोका असल्याने नुकसान होऊ शकते. अधिकारी यावर नजर ठेवून आहेत. परंतु फायदे अधिक असल्याने लोक उंटांना स्वीकारण्यास तयार आहेत. केनियात उंट पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस मारालाल इंटरनॅशनल उंट डर्बी नावाची शर्यत होते. यावेळी सुमारे 40 उंटांनी यात भाग घेतला. विजेत्या उंटाने 21 किलोमीटरचे अंतर कापले.

Advertisement

यापूर्वी भागात साधनसामग्रीसाठी भांडणं व्हायची, पशूपालक गायींना हिरवाई असलेल्या भागात चरण्यासाठी न्यायचे, यामुळे हिंसक संघर्ष व्हायचा, शेकडो लोक यात मारले गेले होते. परंतु उंट हे दुष्काळी भागातही तग धरून राहत असल्याने हा संघर्ष टळला आहे. केनियाच्या दुष्काळी भागात आता उंट सामान्य दृश्य ठरत असून ते गायींची कमतरता दूर करत आहेत.

Advertisement
Tags :

.