कंबोडिया-थायलंड युद्धविरामावर चर्चेस तयार
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा हस्तक्षेप : आतापर्यंत कमीतकमी 31 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सैन्यसंघर्ष समाप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही देशांचे नेते तीन दिवसांपर्यंत चाललेल्या संघर्षानंतर युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी त्वरित भेटण्यास सहमत झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. थायलंड-कंबोडिया संघर्षात कमीतकमी 31 जणांचा मृत्यू झाला असून 1,30,000 हून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
कंबोडिया आणि थायलंडच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांना संघर्ष सुरू राहिल्यास कुणासोबत व्यापार करार करणार नसल्याची धमकी दिली होती असा दावा ट्रम्प यांनी केला. दोन्ही देश तत्काळ युद्धविराम आणि शांतता इच्छित आहेत. तसेच ते त्वरित परस्परांना भेटून युद्धविराम लागू करण्यास सहमत झाले आहेत. दोन्ही देश व्यापारविषयक चर्चेच्या टेबलवर परत येऊ इच्छितात असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेकडून 1 ऑगस्टपासून आयातशुल्क लागू करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर विविध देश त्याच्यासोबत नवा व्यापार करार करू पाहत आहेत.
व्यापार करार न करण्याची धमकी
कंबोडिया आणि थायलंड यांच्यात शांतता प्रस्थापित झाल्यावर मी दोन्ही देशांसोबत व्यापार करारांना अंतिम स्वरुप देण्यास उत्सुक आहे असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. युद्धविराम चर्चेविषयी ट्रम्प यांनी फारशी विस्तृत माहिती दिलेली नाही. तसेच व्हाइट हाउस आणि वॉशिंग्टनमधील दोन्ही देशांच्या दूतावासांनी याविषयी माहिती दिलेली नाही.
थायलंडच्या नेत्याकडून पुष्टी
थायलंड युद्धविरामासाठी तात्विक स्वरुपात सहमत आहे, परंतु कंबोडियाकडून प्रामाणिक हेतू दिसणे आवश्यक असल्याचे वक्तव्य थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधन फुमथम वेचायाचाई यांनी केले आहे. थायलंड युद्धविरामासाठी एक द्विपक्षीय चर्चा आयोजित करू इच्छितो असे फुमथम यांनी स्पष्ट केले आहे.