सॅटेलाईट फोनद्वारे यादगिरीतून पाकिस्तानमध्ये कॉल?
तपास यंत्रणांना संशय : अधिकाऱ्यांकडून चौकशी
बेंगळूर : राज्यात पुन्हा एकदा बंदी असलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर झाल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. यादगिरी जिल्ह्याच्या सुरपूर तालुक्यातील शेळ्ळगी येथून सॅटेलाईट फोनद्वारे पाकिस्तानात फोन केल्याचा संशय बळावला आहे. 17 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता सॅटेलाईट फोनद्वारे कॉल करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. जीपीएस लोकेशक ट्रॅकच्या आधारे केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शेळ्ळगी गावाला भेट देऊन चौकशी केल्याचे समजते. चीनी बनावटीच्या सॅटेलाईट फोनवरून पाकिस्तानात कॉल गेला असावा, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. 17 सप्टेंबर रोजी शेळ्ळगी येथील एका शेतातून पहाटे 3 वाजता हा कॉल करण्यात आल्याचे उशिरा उघडकीस आले आहे. कल्याण कर्नाटक विमोचना दिनादिवशीच ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये यादगिरी तालुक्याच्या हेडगीमद्रा गावाबाहेरून पाकिस्तानात सॅटेलाईट फोनवरून कॉल गेल्याचे उघडकीस आले होते. त्याचप्रमाणे 2014 मध्ये मध्यप्रदेशच्या खांडवा येथील कारागृहातून फरार झालेले सिमी या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मेहबूब गु•tसह काहीजण यादगिरीत लपून बसले होते. आता या जिल्ह्यातूनच सॅटेलाईट फोनवरून कॉल करण्यात आल्याचे उशिरा उघडकीस आले आहे.