कॉल सेंटर तपास आता सीआयडीकडे
राज्य पोलीस महासंचालकांचा आदेश : स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
बेळगाव : अमेरिकन नागरिकांना ठकविण्यासाठी बेळगावात थाटण्यात आलेल्या कॉल सेंटर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी यासंबंधी सोमवारी एक आदेश जारी केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी करणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचदिवशी आझमनगर येथील कुमार हॉलवर छापा टाकून विविध राज्यातील 33 तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये 5 तरुणींचाही समावेश होता. भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 187 व माहिती-तंत्रज्ञान कायदा 66(सी) व 66(डी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. कुमार हॉलचा मालक इजाजखान (वय 45) राहणार आझमनगर यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीची मदत मागितली होती. स्वत: पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फसवणूक प्रकरण असल्यामुळे सीआयडी विभागाची मदत घेण्याचे ठरविण्यात आले होते. सोमवारी हे प्रकरण सीआयडीच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या प्रकरणातील ‘केस फाईल’ त्वरित सीआयडीकडे सोपविण्याची सूचनाही राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे.
त्यामुळे लवकरच कॉल सेंटर प्रकरणाचा तपास सीआयडीला हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एका प्रमुख संशयिताला पळविल्याचा आरोपही झाला होता. आता हे प्रकरण सीआयडीकडे जाणार आहे. त्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेविषयीही चौकशी होणार आहे. यापूर्वी ऑनलाईन फसवणूक प्रकरणात बेळगावात सेवा बजावणारे चार पोलीस अधिकारी अडकले होते. त्यांच्यावर कारवाईही झाली होती.