भटक्या कुत्र्यांनी केले वासराला जखमी
हल्ले वाढले : चिंता कायम, मनपा उदासीन
बेळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. गुरुवारी अशा कुत्र्यांनी एका वासरावर हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता तरी महानगरपालिकेला जाग येणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, मनपाच्या पथकाने तातडीने सर्व जनावरांना पकडून गोशाळेत दाखल केले आहे. शहरात 20 हजारहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. दरम्यान, अशा कुत्र्यांकडून मानव आणि जनावरांवर हल्ले वाढू लागले आहेत. शहरात हॉटेल व इतर लहान-सहान व्यावसायिकांची संख्या वाढल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत भर पडू लागली आहे.
खायला काही न मिळाल्यास अशी कुत्री लहान वासरांवर हल्ले करू लागली आहेत. त्यामुळे शहरात भीती निर्माण होऊ लागली आहे. अलीकडे लहान मुलांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. मनपाने भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणीही होत आहे. गुरुवारी शहरात भटक्या जनावरांना पकडून गोशाळेत दाखल करण्यात आले. मात्र हा केवळ दिखाऊपणा आहे. दोन-चार दिवसानंतर पुन्हा मोकाट जनावरे रस्त्यावर कायम दिसतात. शिवाय भटक्या कुत्र्यांचे हल्लेही होत असतात. यावेळी राजू संकण्णावर, समाजसेवक निलेश, हरीश, सागर पासलकर, रोहित पासलकर आदी उपस्थित होते.