मंत्रिमंडळाची फेररचना 15 ऑगस्टनंतरच
तवडकर सभापतीपदावर कायम राहण्याची शक्यता: मंत्रिपद नेमके कुणाला मिळणार याबाबतचा निर्णय होणार लवकरच
विशेष प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेश चतुर्थीपर्यंत किंवा त्याच्या अगोदर मंत्रिमंडळाची फेररचना होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यामुळे याकामी आता जोर धरू लागला आहे. अलीकडे विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षामधील काही नेत्यांनी सभापती आता मंत्री होणार, असे वारंवार निवेदन केले. यासंदर्भात सभापतींशी संपर्क साधला असता आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सभापतीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले.
सर्व काही तवडकर यांच्यावर अवलंबून
नवी दिल्लीतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सभापती रमेश तवडकर यांच्यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला तर मंत्रिमंडळाची फेररचना लवकर होऊ शकते. सभापतीपद घटनात्मक पद असल्याने या पदावर राहून आपण समाधानी आहे, अशा आशयाची निवेदने अलीकडे सभापती रमेश तवडकर यांनी केली. गेल्या चार दिवसांतील घडामोडींचा विचार करता सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यापेक्षा सभापतीपदी राहण्यावर जास्त भर देण्याचे ठरविले आहे. तवडकर यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सभापतीपद हे मोठे पद आहे. त्यामुळे तवडकर यांनी राजीनामा देऊ नये.
पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील तो शिरसावंद्य : तवडकर
यासंदर्भात सभापतींशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण काही योजना काणकोण मतदारसंघात राबविल्या आणि काणकोणमधील जनतेची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण टाकलेली श्रमधाम योजना ही सध्या जोरात चालू आहे. आपण सातत्याने मतदारांच्या संपर्कात असतो आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावर जास्त भर देत असतो. त्यामुळे मंत्रिमंडळात समाविष्ट व्हावे की न व्हावे हा विषय आपल्यासाठी तसा फार मोठा नाही. पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील तो शिरसावंद्य आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळाची फेररचना लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आता मंत्रीपद दिल्यानंतर संबंधित मंत्र्यांना एक वर्ष दोन महिने काम करता येईल. मध्येच जिल्हा पंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे पुन्हा आचारसंहितेमध्ये काम करता येणे शक्य नाही. यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारही आता फारसे मंत्री होण्यासाठी रस घेत नाही. तवडकर यांना सभापतीपद देण्यात आले होते त्यावेळी त्यांना दोन वर्षानंतर मंत्रीपद सांभाळावे लागेल, असे पक्षाने सूचवले होते परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले असे वृत्त हाती आले आहे.
गणेश गावकर यांना संधी लाभणार ?
आता मंत्रिमंडळाची फेररचना जवळ असून गोविंद गावडे यांच्या जागी नेमकी कोणाला मंत्री करतात हे लवकरच कळून येईल. आणखी तीन मंत्री करावयाचे होते. त्यापैकी रमेश तवडकर हे मंत्रीपद स्वीकारतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत नेमके काय चालले आहे हे कळण्यास मार्ग नाही, मात्र आठ तारीखला राज्याचे अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर रमेश तवडकर हे राजीनामा देणार असे वृत्त होते. तवडकर यांनी सभापतीपदाचा अद्याप राजीनामा दिला नाही याचा अर्थ ते राजीनामा देतील, अशी शाश्वती देता येत नाही. नव्या फेररचनेमध्ये दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना मंत्रीपद दिले जाईल. तवडकर यांनी राजीनाम्यास नकार दिला तर गणेश गावकर यांना संधी मिळू शकते. सध्या मुख्यमंत्र्यांकडे 15 पेक्षा जास्त खाती आहेत त्यामुळेच नवे मंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री आपल्याकडे अतिरिक्त खाती इतरांना देऊ शकतात.