पोलीस संरक्षणात बायपासच्या कामाला पुन्हा सुरुवात
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याला विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी गुरुवारी काम थांबविले होते. परंतु शुक्रवारी मोठा पोलीस फौजफाटा ठेवत शेतकऱ्यांचा विरोध झुगारत बायपासच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जोवर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोवर विरोध सुरूच राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जुने बेळगावजवळील अलारवाड ब्रिजकडून हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ झाला. शिवारात अद्याप पावसाचे पाणी असल्यामुळे काही ठिकाणी रस्ता करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे संथगतीने कामाला सुरुवात करण्यात आली. जुने बेळगावहून वडगावच्या दिशेने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे कंत्राटदाराने यंत्रसामग्री हटविली. हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या आरेखनावेळी चुकीच्या पद्धतीने झिरो पॉईंट निश्चित करण्यात आला. फिश मार्केटऐवजी इतरत्र झिरो पॉईंट निश्चित केल्याने महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने आरेखन झाल्याने रस्त्याचे काम तात्काळ थांबवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात जिल्हा न्यायालयात खटलाही सुरू आहे. जोवर त्याचा निकाल येत नाही तोवर काम होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. परंतु शुक्रवारी सकाळी पोलीस संरक्षणात बायपासच्या कामाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जवळ फिरकूही न दिल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.