बाप्पांची मनोभावे नित्य पूजा केल्याने नराचा नारायण होतो
अध्याय सातवा
अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व वशित्वं या आठ सिद्धी आहेत. सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ती, सफलता इ. असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित करण्यास सिद्धी असे म्हटले गेले आहे. निरिच्छ भक्ताला बाप्पा अशा अनेक सिद्धी लोककल्याणकारी कार्य करण्यासाठी प्रदान करतात ही त्यांची मोठीच कृपा होय. असा भक्त बाप्पांचं सगुण रूप म्हणून वावरत असतो. मिळालेल्या सिद्धींचा वापर करून त्यानं इतर भक्तांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतात. अशा प्रकारे अनेक साधुसंतांनी त्यांच्या भक्तांवर आलेली संकटं दूर केली असल्याचे आपण त्यांच्या लीला चरित्रातून वाचत असतो.
या सिद्धीच्या माध्यमातून बाप्पा त्यांच्या निरिच्छ भक्ताला आपले इशत्व बहाल करतात असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात तो भक्त ईश्वराचं सगुण रूप म्हणून वावरत असतो पण भक्ताच्या दृष्टीने सिद्धी प्राप्त करणं हा परमार्थातील शेवटचा टप्पा नव्हे. सुरवातीपासून आपण पहात आहोत त्याप्रमाणे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हा योग साधणे हेच भक्ताचे अंतिम ध्येय असते. जेव्हा सद्गुरूंना एखाद्या भक्ताच्या बाबतीत असं वाटलं की, याला जर सिद्धी मिळाल्या तर हा त्या टप्प्यावरच रेंगाळेल तर ते त्या टप्प्यापाशी भक्त आल्यावर त्याला तेथून ते गतीने पुढे नेतात व सिध्दीच्या मोहात पडण्यापासून वाचवतात. ईश्वर, सद्गुरु त्यांच्या भक्ताची अत्यंत काळजी घेत असतात. जेणेकरून त्यांचा भक्त कशाचाही मोहात पडून भरकटत जाऊ नये म्हणून ते दक्ष असतात.
बाप्पांची मनोभावे पूजा करत राहिल्याने नराचा नारायण कसा होतो ते आपण बघितलं पण काही लोकं ह्यातलं काहीही लक्षात न घेता बाप्पांच्या पूजेकडं दुर्लक्ष करून इतर देवतांचे पूजन करत असतात. त्याबद्दल बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
मदन्यदेवं यो भक्त्या द्विषन्मामन्यदेवताम् ।
सोऽपि मामेव यजते परं त्वविधितो नृप ।। 12 ।।
अर्थ-जो मी सोडून इतर देवाचे पूजन करतो तो देखील वस्तुत: माझेच पूजन करतो. पण हे राजा, ते अविधियुक्त पूजन होय.
विवरण-बाप्पा म्हणतात, मी ईश्वराचं सगुण रूप आहे. भक्तांच्या भल्यासाठी मी हे रूप धारण केलं आहे. तसेच इतर देवीदेवता ही माझीच म्हणजे ईश्वराचीच रूपे असून काही विशिष्ट कार्यासाठी ईश्वराने ही रूपे निर्माण केलेली आहेत. ही बाब लक्षात न घेता काही लोक मी सोडून इतर देवतांची पूजा करतात. त्यांना असं वाटत असतं की, त्यांना हव्या असलेल्या प्रापंचिक वस्तू किंवा परिस्थितीची अनुकुलता त्यांच्या पुजनातून प्राप्त होईल. ते जरी असं करत असले तरी ती अप्रत्यक्षरित्या माझीच पूजा ठरते कारण तीही ईश्वराचीच रूपे आहेत. असे भक्त जरी इतरांची पूजा करत असले तरी त्याचे फळ मीच त्यांना देत असतो पण प्रत्यक्षात ही माझी पूजा ठरत नसल्याने ती पूजा विधीपूर्वक म्हणता येत नाही. इतर देवतांची पूजा करून त्यांनी मागितलेले फळ त्यांच्या प्रापंचिक गरजा भागवणारे असते. अर्थातच ते तात्पुरते व कालांतराने नाश पावणारे असते. जे निरपेक्षतेनं माझे विधिपूर्वक पूजन करतात त्यांना मात्र मी शाश्वत म्हणजे कायम टिकणारे फळ देतो, म्हणजे त्यांना माझ्या लोकात सामावून घेतो. काही मंडळी कुणाचीच भक्ती न करता बाप्पांसह सर्वच दैवतांचा द्वेष करत असतात ते नरकात जातात असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
यो ह्यन्यदेवतां मां च द्विषन्नन्यां समर्चयेत् ।
याति कल्पसहस्रं स निरयान्दुऽखभाक् सदा ।। 13।। अर्थ- इतर देवतेचा अथवा माझा द्वेष करणारा असून जो कोणत्याही देवतेची पूजा करीत नाही तो सर्वदा दु:ख भोगत राहून हजारो कल्पांपर्यंत नरकाप्रत जातो.
क्रमश: