व्हेरेनच्या शतकाने द.आफ्रिका सुस्थितीत
पहिली कसोटी, वियान मुल्डरचे अर्धशतक, तैजुल इस्लामचे 5, हसन मेहमूदचे 3 बळी, बांगलादेश दु. डाव 3 बाद 101
वृत्तसंस्था / मिरपूर
काईल व्हेरेनच्या समयोचित शतक तसेच मुल्डेरच्या अर्धशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर द. आफ्रिकेने आपली स्थिती अधिक मजबूत करताना बांगलादेशवर 202 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 3 बाद 101 धावा जमविल्या असून ते अद्याप 101 धावांनी पिछाडीवर आहेत. द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात बांगलादेशच्या तैजुल इस्लामने 5 गडी बाद केले.
या कसोटीत खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविला होता. बांगलादेशचा पहिला डाव केवळ 106 धावांत आटोपल्यानंतर द. आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 140 धावांत 6 गडी गमविले होते. या धावसंख्येवरुन द. आफ्रिकेने मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ केला आणि त्यांनी पहिल्या डावात 308 धावांपर्यंत मजल मारली. काईल व्हेरेन आणि वियान मुल्डर या जोडीने सातव्या गड्यासाठी 119 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. काईल व्हेरेनचे कसोटीतील हे दुसरे शतक आहे. मुल्डर बाद झाल्यानंतर व्हेरेनने पीटसमवेत 9 व्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. व्हेरेनने 18 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्याने तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर स्वीपचा चौकार मारुन कसोटीतील आपले चौथे अर्धशतक 67 चेंडूत पूर्ण केले. व्हेरेनने मेहदी हसन मिराज आणि नईम हसन यांच्या फिरकीवर दमदार फटके मारले. तसेच मुल्डरने नईमच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून कसोटी क्रिकेटमधील आपले अर्धशतक 105 चेंडूत पूर्ण केले. व्हेरेनने मिराजच्या गोलंदाजीवर 2 उत्तुंग षटकार मारले. पण शेवटी मेहदी हसन मिराजने व्हेरेनला दासकरवी यष्टीचित केले. तत्पूर्वी हसन मेहमूदने मुल्डरला एस. इस्लामकरवी झेलबाद केले. मुल्डरने 112 चेंडूत 8 चौकारांसह 54 धावा जमविल्या. व्हेरेनने 144 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 114 धावांचे योगदान दिले. हसन मेहमूदने केशव महाराजला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित केले. पीटने 87 चेंडूत 2 चौकारांसह 32 धावा जमविल्याने द. आफ्रिकेला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. व्हेरेन शेवटच्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. द. आफ्रिकेने बांगलादेशवर पहिल्या डावात 202 धावांची आघाडी मिळविली. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 122 धावांत 5, मेहदी हसन मिराजने 63 धावांत 2 तर हसन मेहमूदने 66 धावांत 3 गडी बाद केले.
202 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर रबाडाने एस. इस्लामला केवळ एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर रबाडाने याच षटकातील चौथ्या चेंडूवर मोमिनुल हकला खाते उघडण्यापूर्वी मुल्डरकडे झेल देण्यास भाग पाडले. मेहमुदुल हसन जॉय आणि कर्णधार शांतो यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. केशव महाराजच्या गोलंदाजीवर कर्णधार शांतो पायचित झाला. त्याने 49 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन जॉय आणि मुश्फिकुर रहीम यांनी सावध फलंदाजी करत शेवटच्या अर्धा तासांमध्ये संघाची पडझड होवू दिली नाही. जॉय 80 चेंडूत 5 चौकारांसह 38 तर मुश्फिकुर रहीम 26 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 2 तर केशव महाराजने 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी आहेत. बांगलादेशचा संघ अद्याप 101 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सात गडी खेळावयाचे आहेत. मात्र या कसोटीवर द. आफ्रिकेची पकड अधिक मजबूत झाली आहे.
संक्षिप्त धावफल: बांगलादेश प. डाव 40.1 षटकात सर्व बाद 106, द. आफ्रिका प. डाव 88.4 षटकात सर्व बाद 308 (व्हेरेन 114, मुल्डर 54, पीट 32, झोर्जी 30, स्टब्ज 23, रिकल्टन 27, बेडींगहॅम 11, तैजुल इस्लाम 5-122, हसन मेहमूद 3-66, मेहदी हसन मिराज 2-63), बांगलादेश दु. डाव 27.1 षटकात 3 बाद 101 (मेहमुदल हसन जॉय खेळत आहे 38, मुश्फिकुर रहीम खेळत आहे 31, शांतो 23, एस. इस्लाम 1, मोमिनुल हक 0, अवांतर 8, रबाडा 2-10, केशव महाराज 1-33)