For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साधुसंग न केल्याने मनुष्य बंधनात अडकतो

06:13 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
साधुसंग न केल्याने मनुष्य बंधनात अडकतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सज्जनांना, सद्गुरूंना विनयानं शरण जावे, त्यांचे शिष्यत्व पत्करावे, त्यांची सेवा करावी. त्यांच्या चरणी अनन्य भावाने शरण जावे. त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे म्हणजे शिष्याचे अस्तित्व त्यांच्यात विरघळून जाते. ह्याप्रमाणे त्यांच्याशी अद्वैत साधल्यावर त्यांना आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारावेत. तुमची श्रद्धा पाहून सद्गुरु तुमच्यावर कृपा करून मार्गदर्शन करतात. शिष्य आत्मज्ञान मिळवण्यास पात्र झाल्यावर आत्मज्ञान त्याच्यात प्रकट होते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तो करत असलेल्या कर्मातून पापपुण्याची निर्मिती होत नसल्याने ते कर्म निर्दोष होते. तसेच पूर्वीच्या ज्या कर्माचे फळ भोगण्याची वेळ अजून आलेली नसते ते संचित आत्मज्ञानाच्या धगीत जाळून नष्ट होते. अशा प्रकारे त्यांची सर्व कर्मे आत्मज्ञानात लय पावतात. ह्याजन्मी त्याचे जे भोग भोगायचे राहिलेले असतात ते भोगल्यावर त्याची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते.

आत्मज्ञान म्हणजे काय, ते मिळवण्यासाठी काय करावं, आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर त्या ज्ञानी व्यक्तीची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका कशी होते इत्यादि गोष्टी सांगून झाल्यावर पुढील श्लोकात बाप्पा साधुसंगाचे महत्त्व राजाच्या मनावर ठसवण्यासाठी असे सांगत आहेत की, जे साधुसंग करत नाहीत ते बंधनात अडकतात.

Advertisement

नानासंगाञ्जन कुर्वन्नैकं साधुसमागमम् ।

करोति तेन संसारे बन्धनं समुपैति स ।। 41 ।।

अर्थ- साधुसंग न करता मनुष्य नानाप्रकारचे संग करतो व तेणेकरून तो जगामध्ये बंधन पावतो.

विवरण-सत्संगाचे महत्त्व फार आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला सत्संगती कर असे सांगितले ह्यावरून सत्संगतीचे महत्त्व लक्षात यावे. सत्संगती म्हणून मनुष्य धर्मग्रंथ वाचतो, कथाकीर्तन ऐकायला जातो, धार्मिक व्रतवैकल्ये करतो, कुलधर्म कुलाचार पार पाडतो पण त्याला त्याचा म्हणावा तसा लाभ मिळत नाही. याचं कारण म्हणजे हे सर्व त्यानं यांत्रिक पद्धतीने पार पाडलेलं असतं किंवा करायचं म्हणून केलेलं असतं. त्यात त्याचा मनापासून सहभाग नसतो. बाप्पा मनुष्याच्या अशा विपरीत वर्तणुकीवर या श्लोकात बोट ठेवतायत. लोकांना साधू मंडळींबद्दल आदर असतो ते षडविकार मुक्त असतात हेही त्यांना माहीत असतं पण त्यांच्याकडं असलेलं ज्ञान किंवा ते करत असलेलं सत्कर्म यांचा व्यवहारात काय उपयोग असं त्यांना वाटत असतं. ते सांगतायत तसं आपण व्यवहारात वागत गेलो तर लोक आपला गैरफायदा घेतील अशी भीती त्यांना वाटत असते. लोक साधुसंत मंडळींचं दर्शन घेतात, आदरभाव दाखवतात पण दैनंदिन व्यवहारात त्यांची शिकवण अमलात न आणता स्वत:चा स्वार्थ कशात आहे हे पाहून त्याप्रमाणे वागतात. साधुंजवळ माणसांना आवडणारे विषय किंवा वैषयीक भोगवस्तू मिळत नसल्याने लोक त्यांच्या सहवासात राहायला तयार नसतात. त्याऐवजी इतरांच्या सहवासात राहणे पसंत करतात कारण त्यांना तिथे विषय व वैषयीक भोगवस्तू मिळत असतात. विषयांचा आनंद घेत घेत ते आयुष्य व्यतीत करतात. संतसंग त्यागल्यामुळे त्यांना आपलं भलं कशात आहे, कायम टिकणारा आनंद कसा मिळवायचा व समाधानात जीवन कसं व्यतीत करायचं इत्यादि आध्यात्मिक बाबी त्यांना उमगतच नाहीत. त्यामुळे ते पापपुण्याच्या बंधनात अडकतात. सत्संगातून काय काय प्राप्त होते ते बाप्पा पुढील श्लोकात सविस्तर सांगतायत,

सत्संगाद्गुणसंभूतिरापदां लय एव च ।

स्वहितं प्राप्यते सर्वैरिह लोके परत्र च ।। 42 ।।

अर्थ-सत्संगापासून सर्वांना सदगुणांची उत्पत्ती, आपत्तींचा नाश आणि इहलोकी व परलोकी स्वहित प्राप्त होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.