राजस्थानमधील पोटनिवडणुका 13 ला
वृत्तसंस्था / जयपूर
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. या विधानसभा निवडणुकांच्या समवेत लोकसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकांची आणि विविध राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा पोटनिवडणुकांची संख्या 47 असून त्यांच्यापैकी 7 राजस्थानात आहेत. या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकमेकांशी दोन हात करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
राजस्थानमधील सर्व सात जागा आम्ही जिंकू असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे. तर काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. हरियाणात मिळालेल्या मोठ्या यशामुळे भारतीय जनता पक्षाचा उत्साह शतपटींनी वाढला असून कार्यकर्ते राजस्थानातील पोटनिवडणुका जिंकण्यासाठी आता अधिक जोमाने सज्ज झाले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले. या सात जागांपैकी सध्या भारतीय जनता पक्षाकडे चार, काँग्रेसकडे दोन आणि भारत आदीवासी पक्षाकडे एक जागा आहे. झुनझुनू, दौसा, देवली-उनियारा, खिनवसर, चौरासी, सलुंबर आणि रामगढ अशा सात जागांवर या पोटनिवडणुका 13 नोव्हेंबरला घेतल्या जाणार आहेत.