विधान परिषदेच्या एका जागेसाठी 12 जुलै रोजी पोटनिवडणूक
जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती जागा
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 12 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले. परंतु, नाट्यामय राजकीय घडामोडींनंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपप्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 2 जुलै हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 जुलै रोजी अर्ज छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलै अखेरचा दिवस आहे. 12 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत विधानसभेचे आमदार मतदान करतील. तर सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहे. बिहार, आंधप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील प्रत्येकी एका जागेसाठी देखील 12 जुलैला मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
काँग्रेसकडून उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असून युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बसनगौडा बादर्ली यांना संधी दिली आहे. विधान परिषदेवर संधी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, पोटनिवडणुकीसाठी बादर्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.