लक्ष विचलित करून वृद्धेचे दागिने पळविले
केळकरबाग येथील घटना : साडी देण्याचे सांगून फसविले
बेळगाव : आमच्या सावकारांना 12 वर्षानंतर मुलगा झाला आहे, त्या आनंदात ते तुम्हाला साड्या वाटणार आहेत, असे सांगत दोघा भामट्यांनी बेकिनकेरे येथील वृद्धेच्या अंगावरील तीन तोळे सोन्याचे दागिने पळविले आहेत. रविवारी दुपारी केळकरबाग परिसरात ही घटना घडली आहे. गवळी गल्ली, बेकिनकेरे येथील शोभा अर्जुन लोहार (वय 61) यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शोभा या रविवारी बाजार करण्यासाठी बेळगावला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना गाठलेल्या दोघा भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या अंगावरील चेन, कर्णफुले असे तीन तोळ्यांचे दागिने पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच खडेबाजार पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भामट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. किर्लोस्कर रोडवरून केळकरबाग येथे आणून वृद्धेचे दागिने पळविण्यात आले आहेत.
रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास किर्लोस्कर रोडवर दोघा भामट्यांनी शोभा यांना गाठले. आमच्या सावकारांना 12 वर्षानंतर मुलगा झाला आहे. तुमच्यासारख्या वडिलधाऱ्यांना ते साड्या वाटणार आहेत. त्यामुळे आमच्यासोबत चला, असे सांगत भामट्यांनी शोभा यांना केळकरबागेत नेले. थोड्या वेळात आम्ही सावकारकडे जाणार आहोत, तोपर्यंत तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे भामट्यांनी सांगितल्यामुळे शोभा यांनी चेन व कर्णफुले काढून भामट्यांच्या हातात दिले. ते एका पर्समध्ये घालण्यात आले. तुम्ही येथेच थांबा थोड्या वेळात आम्ही साडी घेऊन येतो, असे सांगत दागिन्यांसह भामटे तेथून पसार झाले. खूप वेळ वाट बघूनही भामटे परतले नाहीत म्हणून आपण फसलो हे शोभा यांच्या लक्षात आले. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.