कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...पण गोव्यासाठी योगदान द्या!

03:06 PM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : गोवा आयआयटीचा दीक्षांत समारंभ

Advertisement

फोंडा : आयआयटी गोवाने शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात अल्पावधीत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. राज्य सरकारचे ‘विकसित गोवा 2037’ हे ध्येय गाठण्यासाठी आयआयटीचा महत्त्वाचा वाटा असेल. पदवी संपादन केल्यानंतर करियरसाठी जगभरात कुठेही जा, पण संधी मिळेल तेव्हा गोव्याच्या विकासासाठीही योगदान द्या. आयआयटी ही जागतिक दर्जाची संस्था असल्याने त्याच दर्जाच्या साधनसुविधा असणे आवश्यक आहेत. सध्या ट्रांजिट कॅम्पसमध्ये चालणाऱ्या आयआयटी गोवासाठी लवकरच स्वतंत्र व सुसज्ज कॅम्पससाठी गोवा सरकार जमीन उपलब्ध कऊन देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

Advertisement

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटी गोवाचा सहावा दीक्षांत समारंभ रविवारी फोंडा येथील कला मंदिरमध्ये झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 145 आयआयटी पदवीधर, 13 एमटेक व 15 पीएचडी धारकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे म्हणून आयआयटी मंडळाचे अध्यक्ष आदील झैनुल्लाभाई व आयआयटी गोवाचे संचालक धीरेंद्र कट्टी हे उपस्थित होते.

पदवीधरांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. पूल, डिजिटल प्लॅटफॉर्म, सेटलाईट, स्वच्छ ऊर्जा अशा सर्वप्रकारच्या भौतिक साधनसुविधा अभियंत्यांच्या दूरदृष्टीतून साकारल्या आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर जे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी होते, त्यांची प्रेरणा व प्रयत्नातून गोव्यात ही संस्था उभी राहिली. अवघ्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात आयआयटी गोवाने शिक्षण, संशोधन आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान असो किंवा कॉलेज प्राध्यापकांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व एआय तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे उल्लेखनीय कार्य केले आहे.

राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोंय आणि अंत्योदय धोरणासाठी आयआयटीची महत्त्वाची भूमिका असेल. गोव्यात डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, अक्षय ऊर्जा आदी शाश्वत विकासकार्यात आयआयटी उमेदवारांच्या बुद्धिमत्तेला आव्हान आहे. स्टार्ट अप आणि इनोव्हेटिव्ह धोरण हे युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे व्यासपीठ आहे. मात्र आयआयटी उमेदवारांनी केवळ नोकरीचा उद्देश न ठेवता इतरांना रोजगार देण्याचे ध्येय उराशी बाळगावे. गोवा कॅम्पसमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोव्याच्या विकासासाठी संधी मिळेल, तेव्हा योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

देशासाठीही योगदान द्यावे : झैनुल्लाभाई 

आदील झैनुल्लाभाई म्हणाले, भारताची जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्न येथील आयआयटीयन पदवीधरांसाठी योग्य संधी आहे. त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ असून भविष्यात 2047 मध्ये नवनिर्माण भारताचे स्वप्न साकारताना तुमचे करियर उच्च शिखरावर असेल. स्वत:च्या भवितव्याला आकार देताना देशासाठीही योगदान देण्याची तयारी ठेवा असे ते म्हणाले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी सर्व पदवीधरांना व्हर्च्युअल माध्यमातून संदेश व शुभेच्छा दिल्या. गोवा ही झपाट्याने पुढे येणारी बौद्धिक अर्थव्यवस्था आहे. त्यात आयआयटी गोवाचे महत्त्वाचे योगदान असेल. गोव्यात मरिन विज्ञान एमटेक आणि केमिकल इंजिनिअरिंग एमटेक येथील वातावरणाला पूरक आहे. या शिक्षणाचा वापर आपल्या भवितव्याबरोबरच देशाचे अर्थकारण आणि संशोधनासाठी करा. उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आयआयटीची भूमिका महत्त्वाची आहे. ज्ञान, विद्वत्ता, गुणवत्ता आणि संशोधन नवभारत निर्माणासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयआयटीसाठी जागेचा शोध सुरू आहे !

आयआयटी गोवासाठी सरकारकडून जमीन कुठे संपादन केली जाणार आहे असा प्रश्न कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना तूर्त या जागेचा शोध सुरू आहे, असे मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. धारबांदोडा येथील संजीवनीच्या जमिनीत आयआयटीसाठी जागा देणार का ? या प्रश्नावरही त्यांनी काहीच भाष्य केले नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article