कॅसिनोचालकांना धक्का व्यवसाय कर 28 टक्केच
कमी करण्याच्या मागणीवर निर्णय ठेवला प्रलंबित
पणजी : कॅसिनोवाल्यांना लागू करण्यात आलेला 28 टक्के व्यवसाय कर यापुढेही चालूच राहणार असल्याने कॅसिनोवाल्यांना धक्का बसला आहे. केंद्र सरकारने गोव्यातील कॅसिनोंवर होत असलेल्या वाढत्या बेकायदेशीर व्यवहारांवर आळा घालण्यासाठी त्यांना विक्री कर 28 टक्के लागू केला होता. त्यानंतर गोवा सरकारने कॅसिनोवाल्यांच्या मागण्या लक्षात घेऊन हा कर कमी करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. काल सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आला असता तो पुढे ढकलण्यात आला. यावर मागावून विचार करूया, असे ठरविण्यात आले आहे. तोपर्यंत आता 28 टक्के कर तसाच पुढे चालू राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की यासंदर्भातील अंतिम निर्णय हा केंद्र सरकारने घ्यावयाचा आहे. जीएसटी मंडळ केंद्र सरकारला विनंती करेल. पुढील बैठकीमध्ये हा प्रस्ताव पुन्हा चर्चेस येऊ शकतो असे ते म्हणाले. त्यामुळे जीएसटी मंडळाच्या बैठकीकडे कान व डोळे लावून बसलेल्या राज्यातील कॅसिनोचालकांना एक जबरदस्त धक्का बसला आहे.