कणकुंबी-चोर्ला रस्त्यावरील झुडपांचा वाहनांना धोका
वळणावर अपघातांच्या वारंवार घटना : झुडुपे हटविण्याकडे वनखात्याचे दुर्लक्ष
वार्ताहर/कणकुंबी
जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडपांमुळे अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर अपघात होत असून विशेषत: कणकुंबी ते चोर्ला रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घनदाट झुडपांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. समोरून येणारी वाहने झुडपांमुळे दिसत नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. यापूर्वी जांबोटी ते कणकुंबी दरम्यान अनेकवेळा अचानक समोरून येणाऱ्या वाहनांमुळे समोरच्या वाहनधारकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहने सरळ रस्त्याच्या कडेला कलंडल्याच्या किंवा अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
बेळगाव-चोर्ला-गोवा या रस्त्याच्या दुतर्फा जांबोटी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी झुडुपे वाढलेली आहेत. सदर झुडुपे गटारापासून ते रस्त्याच्या डांबरीकरणापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. त्यामुळे एखाद्या वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. वाढलेल्या झुडपांमुळेच या मार्गावरील अपघातांची संख्या वाढलेली असून ती हटविण्यासाठी वनखात्याला कधी जाग येणार? असा प्रश्न वाहनधारक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. विशेषत: वनखात्यामुळेच या मार्गाचा विकास थांबलेला असून कणकुंबी भागातील विविध गावच्या अॅप्रोच रस्त्यांचे प्रश्नदेखील वनखात्याच्या आडमुठेपणामुळे रखडलेले आहेत.
तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू!
सद्यस्थितीत बेळगाव-चोर्ला-गोवा हा रस्ता दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून वेळेची व इंधनाची बचत करणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमीच असते. परंतु या मार्गावर अनेक धोकादायक वळणामुळे व अनेक ठिकाणी वाढलेल्या झुडपांमुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. म्हणूनच अपघातांची संख्या वाढत आहे. गुरुवारी बेटणेजवळच्या वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्याने अपघात झाला. यापुढे असेच अपघात होत राहिले तर वनखात्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.