For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव-कोवाड रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा

11:07 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव कोवाड रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा
Advertisement

वळणावरील झुडपांच्या अडथळ्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ, सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देणे गरजेचे

Advertisement

वार्ताहर/उचगाव

उचगाव-कोवाड मार्गावरील उचगाव पेट्रोलपंप (तळोली) ते बेकिनकेरे या गावापर्यंतच्या दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने कुत्र्यांचा सुळसुळाटही वाढला आहे. रस्त्यावर येणारी आडवी कुत्री तसेच वळणावरून वाढलेले झुडुपे यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हे काटेरी कुंपण आणि वाढलेली झुडुपे काढावीत, अशी मागणी प्रवासी आणि या भागातील नागरिकांनी केली आहे. उचगाव-कोवाड हा कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. यामार्गे कोवाड, आजरा, नेसरी, गडहिंग्लजमार्गे कोल्हापूर या मार्गावर अनेक प्रवाशांची ये-जा असते.

Advertisement

मात्र या रस्त्यावरील बसुर्ते फाटा ते बेकिनकेरेजवळील नाला या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा सर्वाधिक काटेरी झुडपे, रानाचे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. रस्त्याची ऊंदीही कमी झाल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तुरमुरी कचरा डेपोतील कुत्र्यांचे कळप सातत्याने या रस्त्यावर वावरत असतात. सदर कुत्री आमराईतून रस्त्याच्या बाजूने धावत असतात आणि या काटेरी कुंपण आणि झुडपातून अंदाज येत नसल्याने अकस्मात ही कुत्री वाहनांच्या आडवी येत असल्याने वाहनचालकांना सातत्याने अपघाताला सामोरे जावे लागते. काही वाहनचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी कुंपण, झुडपे तसेच झाडांच्या फांद्या तोडून हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरील झुडपे त्वरित काढा

उचगाव-बेकिनकेरे मार्गावर दर आठवड्यातून एक दोन अपघात कुत्री वाहनांच्या आडवी आल्याने होत आहेत. वाहनधारक गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना दिसून येतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत व झुडुपे वाढल्याने कुत्री अकस्मात रस्त्यावरती येऊन वाहनांना धडक दिल्याने अपघात घडत आहेत. यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करावी आणि अपघात टाळावेत.

- मल्लाप्पा गावडे, बेकिनकेरे

झाडांच्या फांद्यामुळे अपघात

उचगाव-बेकिनकेरे मार्गाचे काम पूर्ण झाल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. यामुळे वाहनांच्या वेगातही सध्या वाढ आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी कुंपण तसेच झाडांच्या फांद्या आडव्या येत असल्याने वाहतुकीलाही अडचण होत आहे. वळणावरती अपघात होत आहे. तरी पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा अडथळा दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा.

- जयवंत सावंत बेकिनकेरे

Advertisement
Tags :

.